Breaking News

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होणार : सिद्धरमैय्यांचा दावा


बंगळुरू/वृत्तसंस्था : कर्नाटकच्या जनतेच्या आशिर्वादाने आपण पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार, अशी आशा माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी व्यक्त केली. येथे आयोजित एका सभेला त्यांनी संबोधित केले. आपल्याला दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनण्यापासून थांबवण्यासाठी विरोधकांनी हातमिळवणी केली. राजकारणात जात आणि पैसा या गोष्टींना पूर आला होता, असेही सिद्धरमैय्या यांनी सांगितले. मला वाटले, की लोक मला पुन्हा एकदा आशिर्वाद देतील आणि मुख्यमंत्री बनवतील. दुर्दैवाने मी हरलो. परंतु हा काही शेवट नाही. राजकारणात हरणे जिंकणे सामान्य बाब आहे, असे सिद्धरमैय्या म्हणाले. कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसने जनता दल सेक्युलरशी आघाडी करत सरकार स्थापन केले. जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सिद्धरमैय्या यांना माघार घ्यावी लागली.