नव्या विचारांचे भान !

जगातील कोणत्याही राजकीय शक्तीला आजच्या घडीला धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलर विचारांशिवाय पुढे जाता येत नाही. वास्तविक धर्म हा माणसासाठी आवश्यक असतो तो केवळ सामाजिक धारणेसाठी. माणूस हा धर्मासाठी नसून, धर्म माणसांने माणसासाठी बनवलेला आहे. असे असतांना, याच धर्माच्या, जातीच्या नावावर भारतीय राजकारण फिरतांना दिसून येत आहे. आपल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांचा विचार केल्यास जात, धर्म या त्यांच्याठायी गौण बाबी आहेत. मात्र आपण आजही या मुद्द्यांना अतोनात महत्व देऊन, त्यापासून आपले दुसरे जीवन आहे, याचा आपल्याला विसर पडतो. त्यातच कडव्या विचारांच्या संघटना आपल्यावर आपण धर्मासाठी जगलो पाहिजे, धर्मासाठी मेलो पाहिजे, असे विचार बिंबवतात आणि त्यात आपले युवक बळी पडतात. आणि त्या विचारसरणींचा अवलंब करून, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, आणि आपल्या जीवनांचे मातेरे करून घेतांना दिसून येत आहे. प्रत्येक धर्मात शरीर आणि मन यांना एकत्रित आणण्यासाठी अध्यात्माचा एक मार्ग सांगितलेला असतो. त्यामुळे जगातील कोणत्याही धर्मात उपासना आणि प्रार्थना या दोन गोष्टी समान आहेत. जर मानव हा उपासना आणि प्रार्थना करुन स्वत:साठी आणि इतरांसाठी शांतता आणि सद्भावना निर्माण करुन जगण्याचा मार्ग प्रशस्त करत असेल तर तो त्या व्यक्ती धर्माचा आपल्यासाठी लावलेला अर्थ अतिशय योग्य म्हटला जाईल. धर्माला व्यक्ती आणि समाज यांच्या शांतताप्रिय सह अस्तित्वासाठी मानले गेले तर कोणत्याही धर्मामध्ये आपसांत संघर्ष होणार नाही. परंतु मानव समाजासाठी अशा प्रकारची शांतता जर नांदली तर ज्यांच्याकडे अधिकची गुणवत्ता नाही त्यांना त्या-त्या देशांच्या मध्यवर्ती सत्ता केंद्रांवर येताच येणार नाही म्हणून त्या-त्या धर्मातील कडवे किंवा धर्मांध प्रवृत्ती आक्रमक होतांना दिसतात. या प्रवृत्ती जगातल्या बहुतांश धर्मात दिसून येतात. यांची संख्या अत्यंत नगण्य असुनही अशांतता आणि दहशतवाद हा यांचा आधार असतो. भारतातही जी धर्मांध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे सातत्याने केला जात आहे त्याचाही विचार करावा लागेल. त्यांच्यामध्ये वैयक्तीक विचारांमध्येही बदल घडवावा लागेल. सध्या जग आर्थिक विकासाच्या दिशेना मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे जगातील सर्वच देशांचे राज्यकर्ते आर्थिक गुंतवणूक आणि व्यापाराचा व्यवहार यावरच आपले लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे धर्मांध विचारांचा प्रभाव हा दिवसेंदिवस संकुचित होत जाणार असुन त्याला नव्या पिढीच्या विचारांमध्ये स्थान मिळणार नाही. कारण नवी पिढी ही वैज्ञानिक विचार करणारी असल्यामुळे या पिढीला धर्मभावना भडकावून रस्त्यावर उतरविता येणार नाही याची जाण देशातील प्रतिगामी शक्तीला आता येवू लागली आहे. आजपर्यंत देशात हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर जर कधी रस्त्यावर लढा झालाच तर त्यात कोणताही ब्राह्मण, ठाकूर आणि वैश्य या तीन वर्णातील कोणत्याही वर्णाला जीवीत आणि वित्तीय हानी सोसावी लागलेली नाही. धर्मांधपणे रस्त्यावर जो जमाव उतरविला जातो तो साधारणपणे शूद्र किंवा ओबीसी म्हणजेच बहुजन समाजातील तरुणांचा असतो. या तरुणांनाही आपल्या विकासाचे आता भान आले असुन त्यासाठी वैज्ञानिक विचार आणि शैक्षणिक आधार या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. या व्यतिरिक्त आपण इतस्तत: भटकू नये यावर आता तो गंभीरपणे विचार करु लागला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget