Breaking News

रोजगाराच्या संधींसाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाही : लंकेअहमदनगर / प्रतिनिधी
नगर आणि पारनेर दोन्ही तालुके दुष्काळी आहेत. यामध्ये शिक्षित तरुणांचे प्रमाण नगर तालुक्यात मोठे आहे. पण तरुणांच्या हाताला रोजगार नाही. रोजगार उपलब्ध होण्यासाठी नगर-पारनेरच्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले नाहीत. नगरच्या कितीतरी नंतर सुपा एमआयडीसी झाली. तेथे आठ हजारपेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे मत नीलेश लंके प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
नगर तालुक्यातील देहरे येथे निलेश लंके प्रतिष्ठानच्या शाखेचे उद्घाटन नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादा शिंदे , डॉ. अनिल डोंगरे, शाहरुख शेख, विठ्ठल पठारे, साहेबराव काळे, भानुदास भगत, हरिदास जाधव, योगेश कटारिया, गणेश साठे, बाळासाहेब पानसरे, एकनाथ झावरे, सनी लांडगे, महेश काळे, ठकाराम लंके, दत्त खताळ आदींसह मोठ्या संख्येने महिला व तरुण वर्ग उपस्थित होता.
लंके पुढे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून देहरे येथेही भुयारी मार्गचा प्रश्‍न रखडला आहे. भुयारी मार्ग तयार होऊनही, जनतेच्या वापरासाठी रस्ता चालू नाही. हा रस्ता चालू करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच सरकारी जमिनीत ज्या गोरगरीब जनतेने पक्के घरे बांधली आहेत. यांना त्या जागेचा उतारा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत.
नगर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी हव्या आहेत. नगर नंतर औरंगाबाद, रांजणगाव, सुपा, औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. मात्र नगरची औद्योगिक वसाहतीची वाताहात होत चालली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्‍नाकडे कधीही लक्ष दिले नाही. आपण सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून हक्काने भांडतो. त्यामुळे तरुणांना मी त्यांच्यातला वाटतो. मी सर्वसामान्य जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतो, तर याचा काही लोकांना पोटसुळ उठतो. मात्र आपण आपले काम सुरूच ठेवणार आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे.
शिवसेनेत मी प्रामणिक पणे काम केले. मात्र नगर-पारनेर मतदार संघाच्या लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून मला शिवसेनेमधून काढण्यात आले. जनतेला खरी स्थिती माहीत आहे. त्यामुळे जनता पाठीशी खंबीरपणे उभी आहे. असेही लंके यावेळी म्हणाले.