Breaking News

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश


अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री आवास योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य सरकारने संयुक्त भागीदारी धोरणास नुकतीच मान्यता दिली असून, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी महत्त्वाची भुमिका बजावणारे गृहनिर्माण खात्याचे अति. मुख्य सचिव संजीव कुमार यांना रविवार दि.12 ऑगस्ट रोजी घरकुल वंचित मानवंदना देणार आहे. या निर्णयाने घरकुल वंचितांच्या घरांसाठीचा जागेचा प्रश्‍न सुटून राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बलघटक व अल्पउत्पन्न गटातील लाभार्थींना घरकुले बांधण्याची कार्यवाही व्यापक व गतीने होण्यास मदत होणार असल्याची भावना अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
सरकारच्या जमीन व पैशाशिवाय घरकुल वंचितांचे घरे साकार होण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यात हायब्रीड लॅण्ड पुलिंग योजना राबविण्याची मागणी केली होती. ही योजना नगरमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यास संजीव कुमार यांनी परवानगी दिली हाती. याच योजनेच्या धर्तीवर एक पाऊल पुढे टाकत घरकुले उभारण्यासाठी संयुक्त भागीदारी धोरणाला राज्यसरकारने मान्यता दिली असल्याने संपूर्ण राज्यातील घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून खडकाळ पड जमीन म्हाडाकडे देत असताना त्या मोबदल्यात शेतकरी जमीनदारांना 35 टक्के बांधलेली घरे परतावा म्हणून मिळणार आहेत. यामुळे खडकाळ जमीनीच्या मोबदल्यात शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार आहे. नगरसह 382 शहरांमध्ये हे धोरण राबविण्यात येणार असून, घरकुल वंचितांच्या अनेक वर्षाच्या आंदोलनाचे हे फलित असल्याचे अ‍ॅड.गवळी यांनी सांगितले आहे.
जलयुक्त शिवार प्रमाणे ही योजना संपूर्ण देशाला आदर्शवत व दिशादर्शक ठरणारी आहे. साडेतीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने घोषित केलेल्या पंतप्रधान आवास योजना पूर्णत्वासाठी हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे भाजप सरकारची इज्जत वाचणार असून, घरकुल वंचितांचा प्रश्‍न प्रलंबित ठेवला असता तर पुढील निवडणुकित घरकुल वंचितांच्या रोषाला तोंड द्यावे लागले असते. या निर्णयाने घरकुल वंचितांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. महिन्याभरात ही योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार-प्रसार करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अ‍ॅड.कारभारी गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, वीरबहादूर प्रजापती, सखुबाई बोरगे, अशोक भोसले, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे आदी राज्य सरकारकडे पाठपुराव्यासाठी प्रयत्नशील आहे.