Breaking News

लाकडाची अवैध वाहतूक करणार्‍या टेंपोवर कारवाई


कुळधरण / प्रतिनिधी
लाकडाची अवैध वाहतूक करणारा टेंपो कर्जतच्या वाहतुक नियंत्रण शाखेकडुन पकडण्यात आला. कुळधरण मार्गावर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चालकासह टेंपो (एमएच 16 ,क्यु 2657 ) वन विभागाच्या ताब्यात दिला. वन विभागाने टेंपो पोलीस स्टेशनला आणत गुन्हा दाखल केला.
दररोजच्या नियोजनाप्रमाणे सोमवारी सायंकाळी कर्जतहुन कुळधरणच्या दिशेने जाताना ताडपत्रीने बंद केलेला टेंपो कर्जतच्या वाहतुक नियंत्रक पोलिसांच्या निदर्शनास आला. पाहणी केली असता त्यात बाभूळ, लिंब तसेच इतर झाडांची कत्तल करुन ओल्या लाकडांची वाहतुक होत असल्याचा प्रकार लक्षात आला.पोलिसांनी तात्काळ याची माहिती कर्जतच्या वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी टेंपो पोलिस स्टेशनला आणत गुन्हा दाखल केला. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 41 व 52 अन्वये कारवाई करण्यात आली. वनपाल माया देशभ्रतार, वनरक्षक किशोर गांगर्डे, वनमजुर के.ई.नजन, ए.एन. काकडे यांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्या टेंपोचा मालक गुरवपिंप्री येथील तर चालक मुळेवाडीचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

दिवसा कत्तल; रात्रीतुन वाहतूक
कर्जत तालुक्यात वृक्षतोड करुन लाकडाची बेकायदेशीरित्या विक्री करणारी टोळी कार्यरत आहे. मुळेवाडी, गुरवपिंप्री आदी भागातील अनेक लोकांनी वृक्षतोड करुन लाकडाची विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. दिवसभर झाडांची कत्तल करुन रात्री उशीरा तसेच पहाटे टेंपोतुन लाकडाची अवैध वाहतुक केली जाते. टेंपोच्या मागे तसेच पुढील दर्शनी भागावरील नंबर गायब असल्याने अनेक वाहनांची ओळख पटविण्यात अडचणी येतात.