कोर्टात टिकेल असे आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक - आ.राजळे


पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - आरक्षण टिकवायचे असेल तर सर्व शिष्टमंडळांशी चर्चा होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या बाबतीत सर्व निर्णयात माझा सहभाग असेल. अशी निःसंदिग्ध ग्वाही आमदार मोनिका राजळे यांनी आंदोलकांना दिली.
गेल्या दहा दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने, येथील नाईक चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करताना त्या बोलत होत्या. यावेळी सकल मराठा समाजासह सर्व जातीधर्माच्या बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आज यानिमीत्ताने प्रबोधनकार, कीर्तनकार तथा शिवव्याख्यात्या शिवमती भोस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आज प्रथमच मराठा महिला व युवतींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी तर आज सकाळी केदारेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ढाकणे यांनी मंचावर येऊन आंदोलनास जाहिर पाठिंबा दिला.
यानिमित्ताने आमदार राजळेंच्या भूमिकेकडे शेवगांव-पाथर्डी मतदारसंघातील मराठा समाजाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे मंत्री व आमदारांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तालुक्यात परतल्यावर आमदार राजळे काय भूमिका घेतात याबाबत मराठा समाजात उत्सुकता होती. उशिरा का होईना त्यांनी आंदोलनास जाहिर पाठिंबा देऊन सरकारची भूमिका विशद केल्यानंतर आंदोलकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्याविषयी सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला. आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या पाठिंब्याचे वर्तुळ पूर्ण झाले.
दरम्यान सकाळी अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी परवा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासोबत मंचावर एकत्र न येता आज स्वतंत्रपणे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्त संघर्षाचे जाहिर प्रदर्शन झाले. त्यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे यांची उपस्थिती सूचक होती. एकंदरीत सर्वच पक्षाचे नेते अल्पकाळ मंचावर उपस्थिती लावून जातात. त्यानंतर मात्र सातत्याने दुसर्‍या फळीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य समाजच आंदोलनाची धुरा सांभाळत असल्याने त्यातून निर्माण होणारी खदखद आज सकल मराठा समाजातील युवकांच्या तोंडून व्यक्त होत होती. असे असले तरी आंदोलकांचा उत्साह व आशावाद यत्किंचितही कमी झालेला नाही.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget