Breaking News

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा; भारताची सोनेरी घौडदौड रोखली; सिंधूला रौप्य


नानजिंग वृत्तसंस्था

चीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने २१-१९, २१-१० असे पराभूत केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसा खेळ करायला हवा, याचा उत्तम वस्तुपाठ स्पेनच्या कॅरोलिन मरिनने दाखवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. पण ही आघाडी तिला टिकवता आली नाही. दुसऱ्या गेममध्ये तर मरिनच्या खेळापुढे सिंधूची हतबलता पाहायला मिळाली. त्यामुळेच सिंधूच्या सुवर्णपदकाची आशा विरुन गेली आणि तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मरिनने सिंधूवर 21-19, 21-10 असा विजय मिळवला. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधूला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले होते, यावेळीही तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.

. पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरीनला सिंधूने चांगलेच झुंजवले. सिंधूने सुरुवातीला ६-४ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर गेम अत्यंत अटीतटीचा झाला. मरीनने आपला झुंजार खेळ दाखवत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू सपशेल अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल ११ गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा सिंधूने २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण नंतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.