Breaking News

चंद्रपूरच्या 'मिशन शक्ती 'मध्ये आमीर खान सहभागी होणार- सुधीर मुनगंटीवारमुंबई: चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींना ऑलिम्पीकमध्ये सहभागी होता यावे यासाठी “मिशन शक्ती”अभियान राबविण्यात येणार आहे. त्याला अभिनेते आमीर खान यांचे पाठबळ मिळणार असून या मिशनमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मंगळवारी मुंबईत आमीर खान यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही मान्यता दिल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, लवकरच ते यासाठी चंद्रपूर येथे येणार आहेत. ताडोबा अभयारण्य आणि खाणीचे त्यांना आकर्षण आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमधील आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात देशपातळीवर आपले नाव कोरले आहे. नुकत्याच झालेल्या मिशन शौर्यमध्ये याच जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ब्रम्हपुरीचे येरमे बंधू आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपसाठी अॅथेन्स येथे रवाना झाले आहेत. या जिल्ह्यातून सैन्यामध्ये, अर्धसैनिक दलात, पोलिसात काम करणारे अनेक युवक आहेत. या जिल्ह्यांचा देशसेवेसाठी काम केल्याचा आपला स्वतःचा असा इतिहास आहे. ही बाब लक्षात घेता मिशन शक्तीमधून जिल्ह्यातील युवक-युवती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव नक्की वाढवतील असा विश्वासही श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.