Breaking News

सैनिकांसाठी विद्यार्थिनींकडून राख्या व शुभेच्छा पत्र; सुंदरबाई कन्या विद्यालयाचा अभिनव उपक्रम


नेवासा (प्रतिनिधी) - नेवासा येथील कै.सौ.सुंदरबाई कन्या विद्यालयातील विदयार्थींनीच्या वतीने सीमेवर अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशवासियांचे रक्षण करणार्‍या सैनिकांना स्वत: तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्र पाठविण्यात आले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी हा अभिनव उपक्रम नेवासा येथील कै.सौ.सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या वतीने राबविण्यात आला असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. येथील कै.सौ.सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या रंजनाताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक श्रीमती गोरे यांनी मुलींमार्फत सुंदर अशा राख्या तयार करून घेतल्या तसेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सैनिकांचे मनोधैर्य वाढविणारी शुभेच्छापत्रे ही लिहून घेण्यात आली असून ती लवकरच सीमेवर पाठविण्याची व्यवस्था ही करण्यात आली आहे. या उपक्रमाबद्दल प्राचार्या रंजना देशमुख यांचे उपक्रम राबविणार्‍या शिक्षकांचे पालक वर्गासह नागरिकांमधून कौतुक होत आहे.