Breaking News

जिल्ह्यांचे परिवर्तन करणारे विकास प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशमुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेल्वे पूल, जलवाहिनी, नदीपात्राचे रुंदीकरण, सांडपाणी निचरा, पर्यटनाला आणि एकंदरीतच जिल्ह्याचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये जिल्हा परिवर्तनीय प्रकल्प मोहिमेचा आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी या मोहिमेंतर्गत निवडण्यात आलेल्या अमरावती, रायगड, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांतील विशेष प्रकल्पांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी संबंधित जिल्हा कार्यालयात उपस्थित असलेल्या आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन उपस्थित होते.

या जिल्हा प्रकल्पांना निधी मंजूर आहे. प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे विहित कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाबरोबरच सामान्यांनादेखील त्याचा लाभ होणार असल्याने विशेष लक्ष देऊन ते पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.