Breaking News

‘प्लास्टिक’ कारवाईत १ लाखांचा दंड वसूल


शिर्डी / प्रतिनिधी

येथील शिर्डी नगरपालिका आणि नाशिक प्रदूषण महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने शिर्डीत एकत्रित छापे टाकले. प्लास्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून १ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.

राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम शुक्रवारी {दि. १७} शिर्डीत काकड आरतीसाठी व साईसमाधीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी शिर्डी शहरात बंद असतानाही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या विक्री होत आहे. हे त्यांच्या लक्षात आले होते, त्यांनी तात्काळ याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशी केली. जे व्यापारी नियमांचा भंग करतात, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, असा आदेश दिला होता. प्रदूषण महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ही कारवाई बाबत सूचना केल्या. या सूचनेची दखल घेऊन तात्काळ शिर्डीत शहरात मंदिर परिसरासह विविध ठिकाणी आणि बाजारपेठेत छापे टाकण्यात आले. त्यातून या लोकांकडून दंडापोटी १ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.