Breaking News

श्रीलंकेलाही आपल्या कवेत घेण्याचे चीनचे मनसुबे


भारताला घेरण्याचा चीनचा कुटील डाव ; श्रीलंका कर्जाच्या डोहात

नवी दिल्ली/प्रतिनिधी : जागतिक महासत्ता बनू पाहणार्‍या चीननेभारताला चारही बाजुंनी घेरण्याचा कुटील डाव खेळला आहे. पाकिस्तानला लपून होणारी मदत जाहीर असताना आता नेपाळ, म्यानमारनंतर श्रीलंकेलाही आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही दशकांपासून उत्तर श्रीलंका विकासापासून दूर राहिली होती. या भागामध्ये विकास प्रकल्प आणि रस्ते निर्माण करण्याच्या नावाखाली चीन श्रीलंकेला आपल्या जाळ्यात ओढत आहे. दक्षिण श्रीलंकेमधील चीन बनवत असलेल्या प्रकल्पांवर टीका होत असताना आता उत्तर श्रीलंकेतही चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. श्रीलंकेचा हा निर्णय भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण भारत या भागात घरे बांधण्याची योजना राबवत आहे. या प्रकल्पांसाठी श्रीलंकेने चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलले आहे. या पैशांतून चीनकडून दक्षिणेकडे मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांवरून स्थानिकांमध्ये नाराजी आहे. चीन ही मदत म्हणून दाखवत असले तरीही श्रीलंका कर्जाच्या दरीमध्ये कोसळणार आहे. आणि कर्जाची परतफेड करणे कठीण जाणार आहे. उत्तर श्रीलंकेचे क्षेत्र मागील 26 वर्षांपासून सरकार आणि तामिळ बंडखोर (लिट्टे) यांच्यातील संघर्षामुळे विकासापासून दूर राहीले होते. या भागाचा विकास करण्यासाठी चीन मदत करणार असल्याचे चीनच्या दुतावासाचे अधिकारी लू चोंग यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात चीन रेल्वे बिजिंग ग्रुप कंपनीने जाफना जिल्ह्यामध्ये 30 हजार कोटी डॉलर खर्चाच्या तब्बल 40 हजार घरे बांधणी प्रकल्प घशात घातला होता. चीनची एक्झिम बँक यासाठी निधी देणार आहे. परंतू, स्थानिक लोकांनी सिमेंटच्या ब्लॉक ऐवजी विटांचा वापर करण्याची मागणी केल्याने हा प्रकल्प अडकला आहे. यामुळे भारताला ही संधी मिळाली आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी भारतासोबत बोलणी सुरु असल्याचे तामिळ राष्ट्रीय आघाडीचे आमदार एम सुमंथिरन यांनी सांगितले. भारताने पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर श्रीलंकेमध्ये 44 हजार घरे बांधली आहेत. मात्र, चीन भारतापेक्षा कमी किंमतीत घरे बांधणार आहे. यामुळे चीनला तेथील सरकारने पसंती दिली आहे.