Breaking News

माजीमंत्री कोल्हेंची गंगागिरी सप्ताहस्थळी भेट


कोपरगांव श. प्रतिनिधी :

साईशताब्दीनिमित्त आंतरराष्ट्रीय ख्याति प्राप्त साईबाबा शिर्डी येथील प्रसादालयाजवळ १७१ वा गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताह सोहळ्याला भेटी देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सोमवारी सप्ताहस्थळास नुकतीच भेट दिली.

माजीमंत्री कोल्हे यांनी सरालाबेटचे उत्तराधिकारी प. पूू. रामगिरी महाराज यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह शिर्डी पंचक्रोषीतील सप्ताह आयोजक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. नामस्मरणात प्रचंड मोठी ताकद आहे. त्यातून दुःखहरण होते. गंगागिरी महाराजांचा सप्ताह आमच्या गावी द्या, अशी मागणी महंत रामगिरी महाराजांकडे अनेक भाविक करीत आहेत. १६ आॅगस्टपासून सुरु झालेल्या हरिनाम सप्ताहात भाविकांची दररोज गर्दी होत आहे.

यावेळी बोलतांना माजीमंत्री शंकरराव कोल्हे म्हणाले की, शिर्डीकरांसह पंचक्रोषीतील आयोजन समितीने अखंड हरिनाम यशस्वी करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. प. पू. रामगिरी महाराज दररोज उपस्थित भक्तांना अज्ञान दूर करून भक्तीमार्गाचे ज्ञानदान अव्याहतपणे करीत आहेत, ही बाब प्रशंसनीय आहे. त्यातून बोधामृत मिळते. साईबाबांनी सर्वधर्मीय शिकवण देत श्रध्देतून सबुरी निर्माण केली. साईशताब्दीचे औचित्य साधून हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे, हे तुम्हाआम्हा सर्वांचे भाग्य आहे, असेही कोल्हे म्हणाले.