Breaking News

संजीवनी अकॅडमीचे अनाथालयात रक्षाबंधन


कोपरगाव / श. प्रतिनिधी
सर्व बालकांना आनंदी जगण्याचा हक्क आहे, परंतु अनाथ, बेवारशी, बहिष्कृत बालकांचे आई वडीलांचे मायेचे छत्र नियतीने हिरावुन घेतलेले असते. अशा बालकांना किमान सनाच्या दिवशी तरी कोणी आपलसं करावं, त्यांच्यावर मायेची फुंकर घालावी, त्यांच्या भावना जाणुन घ्याव्यात, अशा अनाथ आणि आई वडीलांच्या छत्रछायेखाली असणारे बालक यांच्यात बंधुभावाची रूजवण व्हावी, म्हणुन संजीवनी अकॅडमीच्या संचालिका मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन संजीवनी अकॅडमीच्या इ. 6 वी च्या 64 विध्यार्थ्यांनी शिर्डी येथिल साई सावली बाल अनाथालय येथे जावुन रक्षाबंधन हा बहिण भावाचा पवित्र सण साजरा केला.
स्कूलच्या प्राचार्या श्रीनीला काला यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी अकॅडमीचे शिक्षक आज विद्यार्थ्यांसह राख्या, मिठाई व फळे घेवुन शिर्डीच्या अनाथालयात गेले. संजीवनीच्या मुलींनी अनाथालयातील मुलांना राख्या बांधल्या तर तेथिल मुलींनी संजीवनीच्या मुलांना राख्या बांधल्या. तेथिल अनाथ मुली-मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद हा अंतःकरणाला भिडणारा होता. तसेच आज संजीवनी अकॅडमीच्या पुर्व प्राथमिक वर्गाच्या विध्यार्थ्यांनी कोपरगांव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तेथिल पोलीस बंधुना राख्या बांधल्या. अशा पध्दतीने संजीवनी अकॅडमीमध्ये सर्व जाती धर्मांचे सण, उत्सव, महापुरूषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासुनच भाईचारा व राष्ट्रभक्तिची शिकवण दिली जाते.