पानसरे हत्या प्रकरणी संशयितांची चौकशी नालासोपारा बॉम्बस्फोटक जप्ती प्रकरण

कोल्हापूर - नालासोपारा येथील स्फोटक जप्ती प्रकरणात अटक केलेल्या तीन्ही आरोपींचे कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कनेक्शन असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाशी या संशयितांचा काही संबंध आहे का? याचा तपास करण्यासाठी एसआयटीचे पथक या तिघांना ताब्यात घेणार आहे. याबाबत कोल्हापुरात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. नालासोपारा स्फोटक प्रकरणाशी संबंधित शरद कळसकर याने कोल्हापुरात लेथ मशिन फिटरचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली आहे. कळसकर मुळचा औरंगाबादचा आहे. मात्र, कळसकर समवेत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य 2 साथीदार अनेकवेळा कोल्हापूर, सांगलीला येत होते, अशी माहिती देखील तपासात पुढे आली आहे. शरद कळसकर कोल्हापुरात असताना यावेळी त्याचे मित्र सुधन्वा गोंधळेकर व वैभव राऊत कोल्हापुरात येऊन शरदला भेटत असत. ते सर्व एकाच खोलीत वास्तव्याला असायचे. तेथून सांगली व सातारा येथील मित्रांकडेही ते जात असल्याची माहिती पुढे येत आहे. कोल्हापूर जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागूनच असल्याने बंगलोर येथील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या प्रकरणात वैभव राऊतचा हात आहे काय? याचाही तपास केला जाणार आहे. शिवाय पानसरे हत्या प्रकरणात देखील तिघांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी केली जाणार आहे. कळसकर कोल्हापुरात ज्या ठिकाणी वास्तव्यास होता, त्याची चौकशी करण्यासाठी एक तपास पथक कोल्हापुरात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, तपास यंत्रणांनी याबाबत कमालीची गोपनीयता राखली आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget