Breaking News

मानवी मूल्यांचे आणि संस्कृतीचे संरक्षण साहित्य करीत आहे -कवी रावसाहेब कुवर

साहित्य, कला यांचे काम समाज घडवणारे आहे, लेखक - कवी समाजाला दिशा देतात उन्नत करतात, विविध जीवनानुभवांना सामोरे जात संस्कृतीचे मरण टाळतात, असे विचार कवी रावसाहेब कुवर यांनी येथील कर्म.रामरावजीआहेर महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळाच्या उपक्रमांचा प्रारंभ करताना मांडले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य हितेंद्र आहेर होते. 
आपल्या भाषणात कवी रावसाहेब कुवर यांनी पुढे सांगितले कि, कवी बुद्ध होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो, वेदनेचे झाड त्याच्या मनात असते, संवेदनशीलता हरवल्याच्या काळात विश्वाचे उत्थान कवितेच्या माध्यमातून होत आले आहे. शेतकरी आणि खेडे यांच्यावरील संकटातून मला काव्य निर्मितीची प्रेरणा मिळते आहे. भाषणाच्या ओघात 'गाव झालं गोगलगाय', खेड्यातली पोरं बसली आहेत येड्यासारखी', बॅनरमधली माणसं, बाप, बापाला शहरात करमत नाही' आदी कवितांचे सादरीकरण त्यांनी केले. गझल, गीत, ओवी, मुक्तछंद या काव्यरचनांचा परिचयही झाला. 
प्रास्ताविकात डाँ.अेकनाथ पगार यांनी रावसाहेब कुवर यांच्या 'हरवल्या आवाजाची फिर्याद' या संग्रहाचा आशय मांडत, मराठी वाङमय मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी विद्यार्थ्यांच्या वाङमय निर्मितीचे माध्यम म्हणून मराठी वाङमय मंडळाने काम करावे, विद्यार्थ्यांनी निर्भयतेने वाङमयनिर्मिती करावी, वाचन करावे असे आवाहन केले, जयेश अशोक निकम यांनी आभारप्रदर्शन केले. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. जयमाला चंद्रात्रे, प्रा. श्रीमती आहिरे, जयवंत भदाणे आदी प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.