Breaking News

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी खंडणीची मागणी


माजलगाव (प्रतिनिधी)- ‘हम यहां के भाई है.. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडायची असेल तर आम्हाला हजार रुपये दे’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणार्‍या दोघांवर माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील शिवाजीनगर भागात राहणारे गणेश राधाकिसनराव नायबळ यांनी मित्रांच्या सोबतीने गणेश मंडळ स्थापन करून गणपती बसविला आहे. मंगळवारी रात्री आरती आटोपून गणेश त्याच्या मित्र रंगनाथ सोबत गप्पा मारत थांबला असताना ९.३० वाजता मनोज बोकन व सय्यद फिरोज (दोघेही रा. फुलेनगर, माजलगाव) हे दोघे तिथे आले. हम यहा के भाई है, मेरे पे दो हाफ मर्डर के केस है, तब भी मै जेल के बाहर हुं, मै किसी को नही डरता.. तुमच्या गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडायची असेल तर आम्हाला हजार रुपये द्या अन्यथा आम्ही मिरवणूक शांततेत होऊ देणार नाही अशी धमकी देत त्यांनी खंडणीची मागणी केली.
गणेशने त्याला विरोध केला असता त्या दोघांनी त्यास धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी गणेशचा आरडाओरडा ऐकून त्याचे इतर मित्र तोठे धावत आल्याने बोकन आणि फिरोज यांनी पळ काढला. याप्रकरणी गणेश नायबळ यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींवर कलम ३८४, ३२३, ३४, ५०४, ५०६ अन्वये माजलगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.