Breaking News

चांगल्या इंजिनइरसाठी उत्सुकता आवश्यक : डॉ. शास्त्री


सातारा (प्रतिनिधी) : इंजिनइरिंगला प्रवेश मिळून चार वर्षात पदवी मिळाली की इंजिनइर झाला एवढे इंजिनइरिंग सोपे नाही. तर चांगला इंजिनइर होण्यासाठी उत्सुकता कायम जागृत ठेवावी लागते, असे मत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. पी. व्ही. श्रीनिवास शास्त्री यांनी व्यक्त केले. 

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये 15 सप्टेंबर हा इंजिनइर्स डे म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उद्योजक संदीप कणसे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. डॉ. एन. जी. नार्वे, माजी विद्यार्थी धीरज राजेघोरपडे उपस्थित होते. 

डॉ. शास्त्री म्हणाले, इंजिनइरिंग हे उत्तर शोधण्याचे साधन आहे. त्यासाठी आपल्याला कायम प्रश्न पडत राहिले पाहिजे. जेव्हा आपल्यामध्ये उत्सुकता असेल तेव्हाच हे प्रश्न पडत राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली उत्सुकता जपावी. आपल्या आजुबाजुला अनेक गोष्टी घडत असतात त्या काळजीपूर्वक पहाव्यात. त्यातूनच नाविण्याचा शोध लागू शकतो. अगदी लहान गोष्ट असली तरी त्याबाबत दाखविलेली उत्सुकता मोठा रोजगार निर्माण करू शकते. 

उद्योजक संदीप कणसे म्हणाले, समाजाची गरज पाहून निर्मिती करण्याचे धाडस नव्या पिढीने दाखवावे. समाजात अनेक गोष्टींची गरज असते. ही गरजच शोधाची जननी आहे. त्यामुळे समाजाच्या गरजेचा शोध चांगला इंजिनइर होण्यासाठी घेतला गेला पाहिजे. यावेळी धीरज राजेघोरपडे यानेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

प्रा. दशरथ सगरे, संचालक प्रा. डॉ. एन. जी. नार्वे यांनी मार्गदर्शन केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनइर्स डे निमित्त मिनी प्रोजेक्टचे प्रदर्शन तसेच पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उद्योजक संदीप कणसे आणि धीरज राजेघोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला इंजिनइरिंग, पॉलिटेक्निक कॉलेजचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. पी. डी. पाटील व प्रा. सौ. एस. जी. चव्हाण यांनी केले तर जनसंपर्क संचालक प्रा. दीपक शिंदे यांनी आभार मानले.