Breaking News

तीन पोलिसांची दहशतवाद्यांकडून हत्या


सरकारी नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेंची धमकी 


शोपियाँ : दक्षिण कश्मीर भागात आज दहशतवाद्यांनी 3 पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांनी या पोलिसांचे त्यांच्या घरातून अपहरण केले होते. पोलिसांच्या या हत्येची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेने घेतली आहे. यापैकी 3 विशेष पोलीस अधिकारी होते. या दहशतवाद्यांनी पोलिसांना कप्रान या गावातून घराबाहेर काढून त्यांचे अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी एकूण 4 पोलीस अधिकार्‍यांचे अपहरण केले होते. यातील एका अधिकारी गावकर्‍यांच्या मदतीने दहशतवाद्यांच्या तावडीतून बचावले, अशी माहिती गृहमंत्रालयाकडून मिळाली आहे. शोपियाँजवळील एका गावात या 3 पोलिसांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळले आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, अशी धमकी दिली होती. या पळवून नेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनाही परिणामांना तयार राहा अशी धमकी देण्यात आली होती. दरम्यान, मरणाच्या भीतीपोटी काश्मीर खोर्‍यात 36 पोलिसांनी तडकाफडकी राजीनामे दिलेत. गेल्या महिन्यातही 10 पोलीस कर्मचार्‍यांना पळवून नेण्यात आलं होतं. त्यांना नंतर सोडून देण्यात आलं होतं. पण अतिरेक्यांनी या वेळी मात्र त्यांची धमकी सत्यात उतरवली आहे. या दहशतीमुले आता अनेक काश्मिरी पोलीस राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. माझं नाव अमुक अमुक... मी राजीनामा देत आहे, असं सांगणारे पोलीस कर्मचार्‍यांचे व्हिडिओसुद्धा काश्मीर खोर्‍यात व्हायरल करण्यात आलेत. दरम्यान पोलिसांमध्येच दहशत पसरत असल्याने काश्मीर कोर्‍यात कायदा आणि सुव्यवस्थेपुढे मोठं आव्हान आहे.