Breaking News

केंद्रीयमंत्री आठवलेंकडून आंबेडकरी जनतेचा वापर : गायकवाड


राहुरी प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री खा. रामदास आठवले सध्या ‘मोदी भक्त’ झाले आहेत. त्यांना आंबेडकरी जनतेचे काहीही घेणे देणे राहिलेले नाही. त्यांची धेयधोरणे जनतेला पटत नाहीत. त्यांनी आंबेडकरी जनतेचा वापर केला आहे, असा आरोप युनाईटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक, अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी केला.

ते म्हणाले खा. आठवले यांचे उत्तरेत कार्यकर्ते राहिले नाहीत. तरुण बेरोजगार झाले आहेत. शासकिय सेवेत अनुशेष भर्ती बंद आहे. सेवेत असणाऱ्यांची पदोन्नती बंद आहे. अनुसुचित जमातीसाठी ज्या १५ टक्के निधीची तरतूद असते, ती राबविली जात नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षाही या सरकारच्या काळात सर्वसामान्य माणूस असुरक्षित झाला आहे. आठवले भाजपात असल्याने त्यांनी सरकारविरोधी बोलने बंद केले आहे. सध्या जातीयवादी शक्ती निर्माण होत आहे. धर्मनिरोपक्ष शक्तीचे निरुपण व्हावे, यासाठी युनाईटेड रिपब्लिकन पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. 

यावेळी जिल्हा सचिव सादिक शिलेदार, प्रविण लोखंडे, भाऊसाहेब पगारे, दिपक साळवे, किरण साळवे, गोवर्धन येवले, विश्वनाथ राऊत, अॅड. चोखर, अॅड. अजय पगारे, बाळासाहेब देशमुख, ऋषिकेश राऊत, सुभाष साळवे, नितीन साळवे, पिंटू साळवे, आकाश भिंगारदिवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, युनाईटेड रिपब्लिकन पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब पगारे, जिल्हा उपध्यक्षपदी दिपक साळवे, शहराध्यक्षपदी किरण साळवे, सेक्रेटरीपदी सुभाष साळवे आदींच्या निवडी करण्यात आल्या.

भाजपाने आंबेडकरी जनतेला फसविले

खा. आठवले यांच्याबरोबर १५ ते २० वर्षे समाजासाठी खांद्याला खांदा लावून लढलो. मात्र समाजाला न्याय मिळाला नाही. सत्तेच्या राजकारणात सहभागी व्हावे म्हणून सहभागी झालो. भाजपाबरोबर युती होऊनही या काळात ज्या घटना घडल्या, त्या अत्यंत निंदनीय आहेत. निवडणुकीत भाजपाने इंदू मिल, बाबासाहेबांचे स्मारक हे मुद्दे पुढे करत आंबेडकरी जनतेला फसविले.