Breaking News

गणेश विसर्जनाचा तिढा कायम


सातारा (प्रतिनिधी) - गणेश विसर्जनाचा तिढा वाढत चालला असून, जिल्हा प्रशासनापुढे मोठा प्रेचप्रसंग निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही आणि लोकभावनाही दुखावली जाणार नाही, याची काळजी घेत प्रशासनाने गणेश विसर्जनासाठी वेगळा पर्याय काढावा. गणेश मंडळांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने विसर्जनासाठी मध्यवर्ती ठिकाण निवडावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

याबाबतच्या प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे, की ऐन गणेशोत्सवाची धामधूम सुरु असताना अद्यापही गणेश विसर्जन कोठे करायचे हा प्रश्न सुटलेला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन जिल्हा प्रशासन करत असून, जिल्हा प्रशासनाने विसर्जनासाठी काही ठिकाणे सुचवली आहेत. असे असले तरी शहरातील रस्त्यांची सध्याची स्थिती पाहता आणि गणेशमंडळांना विसर्जनासाठी त्रास होऊ नये, यासाठी विसर्जनासाठी मध्यवर्ती ठिकाण निवडणे आवश्यक आहे. गणेशोत्सव पूर्णपणे शांततेत पार पडावा, विसर्जनही विनाविघ्न पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगळा पर्याय शोधावा.

गणेशोत्सव हा एक भावनिक उत्सव आहे. विसर्जनालाही फार मोठे भावनिक महत्व आहे. त्यामुळे प्रशासनानेही न्यायालयाचा अवमान होणार नाही याबरोबरच लोकभावनेलाही महत्त्व दिले पाहिजे. संपूर्ण गणेशोत्सव शांततेत पार पाडायचा असेल, तर प्रशासनाने तातडीने विसर्जनासाठी सर्वाना सोयीचे असे मध्यवर्ती ठिकाण निवडावे. लवकरात लवकर विसर्जनासाठी मध्यवर्ती ठिकाण शोधून तशी घोषण करावी, अशी आठाही मागणी शिवेंद्रराजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.