Breaking News

… अखेर धास्तावलेल्या ‘छाया’ला मिळाला ‘साई आश्रय’!


शिर्डी प्रतिनिधी

आजच्या इंटरनेटच्या जमान्यात अवतीभवती चित्रविचित्र घटना घडत असल्याचे नेहमी पहायला मिळते. यात काही घटना मनाला खूपच चटका लावून जातात. यात काही चांगल्या असतात तर काही धक्कादायक. बुलढाण्याच्या छाया नावाच्या मुलींबाबत असेच काहीसे ‘आक्रित’ घडले. सुदैवाने सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या काही सामाजिक कार्यर्त्यांसह स्थानिक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे छायाला हक्काचा आश्रय मिळाला. तिची ही करून कहाणी … 

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेली छाया बुलढाणा येथील महानुभव पंथ आश्रमात लहानची मोठी झाली. शिक्षण आठवीपर्यंत झाले. बहिण मनिषा अधूनमधून फोन करायची. छाया आता जवळजवळ १८ वर्षांची होत आली. आश्रमात असल्यामुळे तिथे एक तर संन्यास घ्यावा लागतो किंवा प्रपंच करायचा असल्यास आश्रम सोडावा लागतो. हा सर्व विचार करून छायाला तिच्या बहिणीने छायाला बोलावून घेतले. छाया आश्रमातून बहिणीकडे जायला निघाली. बहिण मनीषाने शिर्डीजवळील पिंपळवाडी गावात यायला सांगितले. दुपारी चार वाजता छाया पिंपळवाडीत पोहोचली. परंतु बहिणीने स्वार्थ साधला. छाया आपल्याकडे आल्याने अडचण होत आहे, असे वाटल्याने तिने फोन बंद केला. बहिणीचा फोन बंद असल्याने छाया घाबरून गेली . पिंपळवाडीत शोध घेऊ लागली. परंतु कदाचित पत्ता खोटा असावा. गावात मनीषा नाव असलेल्या सर्व घरांना ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्यात आला. पण या स्वार्थी बहिणीचा कुठे पत्ता नाही सापडला. शेवटी ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात कळविले. एकटी मुलगी कुठे जाणार, पोलिसांनीदेखील शोध घेतला. पण मनीषा आणि तिचे घर सापडले नाही. बहिणीने खोटा पत्ता दिल्याचे सर्वांच्या लक्षात आले. तेंव्हा पोलिसांनी साईआश्रय या आश्रमात संपर्क साधला. तेथे निराधार छायाला आश्रय देण्यात आला. बुलढाणा येथील आश्रमात तेथील बाबांना फोन करण्यात आला. छाया येथून पुढे साईआश्रयात राहणार असून योग्यवेळी, योग्य परिवार मिळाल्यास छायाचे लग्न करण्यासाठी काका कोयटे, साईआश्रय परिवार, शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या नियोजनातून कायदेशीर व धार्मिक पद्धतीने लग्न लावण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

छायाला मिळाले ३६ बहिणी आणि ४८ भाऊ 

साईबाबांच्या कृपाआशीर्वादाने छायाला हक्काचे घर अर्थात साईआश्रय मिळाले. तिच्या नवजीवनाची आनंदाने सुरुवात झाली. मात्र स्वार्थापोटी माणुसकी हरवत चाललीय का, हा मोठा गहन प्रश्न या प्रसंगामुळे उपस्थित होत आहे. सुदैवाने छायाला या परिवारात ३६ बहिणी आणि ४८ भाऊ मिळाले.