Breaking News

दिवाळी निमित्त एसटी महामंडळाच्या जादा बसेस 1 नोव्हेंबरपासून जादा बसेस, दिवसाकाठी तिन हजार कि.मि.चे नियोजन


बुलडाणा,(प्रतिनिधी)ः दिवाळी निमित्त एसटी महामंडळाकडून जिल्ह्यात 3 हजार 733 किलोमिटरचे नियोजन करण्यात आले असून यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सुटीमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महामंडळ दरवर्षी जादा महत्वाच्या मार्गावर जादा बसेसची व्यवस्था करीत असते. यामध्ये महामंडळाच्या उत्पन्नात सुध्दा मोठी वाढ होत असते. अलीकडे तर दिवाळीच्या सुटीमध्ये प्रवाशांनी एसटी बसनेच प्रवास करावा म्हणून अनेक ठिकाणी महामंडळाकडून विविध उपक्रम सुध्दा राबविल्या जातात. यावर्षी 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत ‘दिवाळी जादा’ म्हणून बसेस सोडण्यात येणार आहेत. दिवाळीचा उत्सव 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानुसार एसटी महामंडळाने बसफेर्‍यांचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये एका दिवसाला 19 शेड्युल व 3 हजार 733 किलोमिटरचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाकडून करण्यात आले आहे. दिपावली सणामध्ये सलग सार्वजनिक सुट्टया येत असल्याने प्रवाशांच्या गर्दीमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे मध्वर्ती कार्यालयाने दिलेल्या व नियंत्रण समितीने दिलेल्या जादा फेर्‍या सुरू करण्यात येणार आहे. विविध मार्गांवर नियमितपणे बससेवा सुरू करण्याऐवजी कोणत्या मार्गांवर कोणत्या दिवशी प्रवाशांची गर्दी होते, याबाबत यापूर्वीचा अनुभव विचारात घेऊन पूर्वनियोजित जादा वाहतूकीचे नियोजन करून जादा वाहतूक करण्यात येणार आहे. जादा वाहतूकीमुळे ऐनवेळी स्थानकावर होणार्‍या गर्दीचे नियोजन करण्यामध्ये अधिकारी कामाला लागले आहेत. 1 नोव्हेंबरपासून जादा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. ह्या जादा फेर्‍या 20 दिवस चालणार आहेत.अशी माहीती विभागीय वाहतुक अधिकारी यांनी दिली.