Breaking News

शेअर बाजार पुन्हा कोसळला; निर्देशांकात तब्बल 1000 अंकांची घसरण


मुंबई : शेअर बाजारात गुरूवारी सकाळीच मोठी पडझड झाली असून, बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1000 अंकांनी खाली आला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीचा निर्देशांकही 244 अंकांनी खाली येऊन 10,200 वर आला होता. दुपारनंतर मुंबई शेअर बाजारात किंचित सुधारणा झाली असली तरी निर्देशांक 783 अंकांनी खालीच असून तो 34,062 वर आला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 74.30 रुपयांवर स्थिरावला आहे. यामध्ये 10 पैशांनी घसरण झाली आहे. एका डॉलरची किंमत सध्या 74.44 रुपये झाली आहे. सेन्सेक्सच्या घसरणीमुळे एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड सुरू असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने 461 अंकांची मुसंडी मारली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटींची भर पडली होती. मात्र, गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीच्या फटका बसला. गुरुवारी सकाळी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी गडगडला. सेन्सेक्स 1000 अंकांच्या घसरणीसह 33, 833. 27 वर पोहोचला असून निफ्टीतही 300 अंकांची घसरण झाली. निफ्टीचा निर्देशांक 10, 159. 90 वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील मंदीचा फटका भारताच्या शेअर बाजाराला बसला. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 18 पैशांनी भक्कम झाले होते. मात्र, गुरुवारी रुपयानेही ऐतिहासिक तळ गाठला. 26 पैशांच्या घसरणीसह रुपयाने 74. 46 एवढा निचांक गाठला.

31 पैकी 30 शेअर्सचे भाव कोसळले
शेअर बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यावर भागधारकांनी विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्समधील 31 पैकी 30 शेअर्सचे भाव कोसळले, तर निफ्टीमधील 50 पैकी 46 शेअर्सचे भाव कोसळले. सुरुवातीलाच 697 अंकांच्या घसरणीसह उघडलेला सेन्सेक्स काही वेळातच 1000 अंकांनी कोसळला. एस-400 करारामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने भारतावर निर्बंध घालण्याचे दिलेले संकेत आणि आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा प्रतिकूल परिणाम सेन्सेक्सवर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शेअर बाजारातील या घसरणीमुळे काही मिनिटांमध्येच 4 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.