Breaking News

जिल्ह्यातील 10 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या


बुलडाणा,(प्रतिनिधी): जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाने 20 ऑक्टोबर रोजी आयोजित बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरिक्षक अशा एकूण दहा पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित गुन्हे तपासाची कागदपत्रे, अर्ज चौकशी व इतर प्रलंबित प्रकरणे पोलिस ठाण्यातील अन्य पोलिस अधिकार्‍याकडे हस्तांतरित करून बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ हजर राहून त्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिले आहेत.

बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भामरे यांची प्रभारी अधिकारी म्हणून येथील जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. तर विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी एफ.सी. मिर्झा यांची दसरखेड एमआयडीसीचे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली तर तेथील ठाणेदार माधव गरुड यांची बोराखेडी येथे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली. धामणगाव ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक मालती कायटे यांची बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी येथील स्थागुशाचे संग्रामसिंह पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नियंत्रण कक्षाचे प्रशांत संदे यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात तर याच विभागाचे किरण कांबळे यांची शेगाव शहर पोलिस ठाण्यात तसेच नीलेश उरकडे यांची शिवाजी नगर खामगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तसेच शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक बबन रामपुरे यांची बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तर चिखली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद मदन यांची बोराखेडी पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.