Breaking News

नगर -पुणे महामार्गावरील अपघातात आठ प्रवासी ठार; 14 प्रवासी जखमी


अहमदनगर/प्रतिनिधी । नगर-पुणे महामार्गावर वाडेगव्हाण फाट्यावर एका भीषण अपघातात आठ जण जागीच ठार झाले आहे. पळवे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण फाटा येथे सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली होती. औरंगाबादहून पुण्याला जाणार्‍या खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात प्रचंड भीषण होता. भरधाव बसची धडक बसताच ट्रक उलटला. त्यामुळे बसमधील आठ प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात 15 जण जखमी झाले असून त्यातील तीनजण गंभीर जखमी आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरू केले. बस चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 

औरंगाबाद येथुन भावना ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्रमांक एम.एच 14 बी.ए.9312 ) ही औरंगाबाद येथुन प्रवासी घेऊन जात असताना सुपा पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाडेगव्हाण शिवारात सदर बसने हायवे रोडवर चाललेल्या मालट्रक (क्र.एम.एच.12.डी.जी.4620) हीस पाठीमागुन जोराची धडक दिल्याने अपघात झालेला असुन अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ सुपा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह 7 पोलीस दल तसेच 108 रुग्णवाहिका, डॉ. विलास काळे, नरेंद्र मुळे, राजेंद्र घुले घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने येथील जखमीना मदत कार्य सुरु करुन रुगणालयात हलवण्याचे काम केले. दरम्यान, या अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र येथे पाहायला मिळाले.

मृतामध्ये प्रमोद उत्तम मोरे (राहणार सायगाव, ता. मेहकर, जिल्हा बुलडाणा), महंमद आरेफ यांची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. तर या अपघातात जखमी झालेले सुरज शंशीकांत चव्हाण (वय 23), प्रियंका राजाराम पाटील (वय 26, पुणे), आकाश बबन तरपे (वय 20, हिंगोली), रामेश्‍वर बळीराम वाकचौरे (वय 29,औरंगाबाद), अश्‍विनी सुभाष कुलकर्णी (वय 28 रा.आरंगाबाद), सायली सुभाष कुलकर्णी (औरंगाबाद), मुबशर अहमंद शेख (औरंगाबाद), प्रिया सुनिल पाटील (वय 24, पुणे), मृणाल दिवानजी (वय 25, औरंगाबाद), प्राची सचिन गौसावी (वय 21), स्नेहा जयकमार गोसावी (वय 23), अनिल पांडुरंग गुरव (वय 23), किशोर धनराज मुंरबे (वय 45) या प्रवाशांवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील अनेकांना उपचारा दरम्यान घरी सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. सदरच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 14 जणांवर उपचार सुरु होते. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.