Breaking News

15 लाखांच्या आश्‍वासनाबाबत गडकरींचा ‘यू-टर्न’


नवी दिल्ली : 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही सत्तेवर येणार नाही, असा आमचा विश्‍वास होता. त्यामुळे मनात येतील तशी आश्‍वासने आम्ही दिली होती, असा गौप्यस्फोट करणारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावर आता गडकरींनी ‘यू-टर्न’ घेतला आहे. या व्हिडिओचे चुकीचे भाषांतर केल्यावरुन एका इंग्रजी वर्तमान पत्राला सुद्धा त्यांनी खडसावले आहे. नरेंद्र मोदी आणि 15 लाखांच्या आश्‍वासनाचा त्या व्हिडिओमध्ये कोठेही उल्लेख नाही, असे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन गडकरींचा एक व्हिडिओ शेअर केला होता. निवडणुकांच्या वेळी केलेले आश्‍वासन हे खोटे होते, अशा आशयाची राहुल गांधीची ती पोस्ट होती. त्यानंतर तो व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला. त्यावर नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्टीकरण दिले आहे. राहुल गांधींना मराठी येत नाही, म्हणून त्यांनी तसे भाषांतर केले.तर, त्या वृत्त पत्रानेही त्याचे चुकीचे भाषांतर केले आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले. वृत्त पत्राने केलेल्या चुकीच्या भाषांतरानुसार मी मुलाखतीत कोठेच पंतप्रधान मोदींचा आणि केंद्र सरकारच्या घोषणांचा उल्लेख केला नाही, असे गडकरींनी स्पष्ट केले आहे. 
गोपिनाथ मुंडे हयातीत होते त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भाजप निवडूण येणार नाही, असे आम्हाला वाटत होते. म्हणून आपण कोणतीही आश्‍वासने दिली तरी आपल्यावर याची जबाबदारी येणार नाही. त्यामुळे आम्ही अशी आश्‍वासने दिली होती, असे नितीन गडकरींनी पत्रकारांना सांगितले. हे आश्‍वासन महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याचे होते. निवडणुकांच्या पूर्वी दिलेल्या त्या आश्‍वासनांची आम्ही पूर्तताही केली आहे, असेही ते म्हणाले.

आम्ही सत्तेवर येऊ असा विश्‍वास नव्हता... 
‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्ती करण्याची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना अशी घोषणा करु नका, आर्थिक दृष्टीने यामध्ये खूप अडचण येईल असं सांगितलं होतं. यावर त्यांनी मस्करीत मला म्हणजे तुम्हाला आपलं राज्य येईल असा विश्‍वास आहे असं म्हटलं. त्यावर मी आलं तर आपल्याला पूर्ण करावं लागेल असं म्हटलं’.पुढे त्यांनी सांगितलं की, ‘अनेक वर्ष विरोधी पक्षात असल्याने जेव्हा आम्ही जाहीरनामा तयार करायचो तेव्हा अनेक घोषणा करायचो, कारण आम्हाला सत्तेत असण्याचा अनुभव नव्हता’.