Breaking News

प्रत्यक्ष कर संकलनात 15.7 टक्क्यांची वाढ;ऑक्टोबरपर्यंत 4.89 लाख कोटी जमा


नवी दिल्ली : देशात प्रत्यक्ष कर संकलनात चालू वित्तीय वर्षात 15.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या तिस़र्‍या आठवड्यापर्यंत 4.89 लाख कोटींची रक्कम करापोटी जमा झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी याविषयी माहिती दिली. चालू वित्तीय वर्षात 11.5 लाख कोटींच्या प्रत्यक्ष कराचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. सध्या संकलित झालेली रक्कम या उद्दिष्टाच्या 42 टक्के आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डच्या अधिका़र्‍याने दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाने मागील आठवड्यापर्यंत 1.09 लाख कोटींचे 2 कोटी रिफंड जारी केले आहेत. 

ताज्या आकडेवारीनुसार, मागील वित्तीय वर्षातील इतक्याच कालखंडात रिफंड मिळालेल्या करदात्यांच्या तुलनेत आताची संख्या 62 टक्क्यांनी वाढलेली आहे. मागील वित्तीय वर्षात या कालावधीत 83 हजार कोटींचे 1.22 कोटी रिफंड जारी करण्यात आले होते. रिफंड रकमेच्या तुलनेत 31.7 टक्के नफा झाला आहे. संबंधित अधिकार्‍याने सांगितले की, प्राप्तिकर विभागाला 21 ऑक्टोबरपर्यंत 5.8 कोटी प्राप्तिकर रिटर्नस् मिळाले. मागील वित्तीय वर्षात हा आकडा 3.6 कोटी होता. ही वाढ 61 टक्के इतकी आहे. देशातील करदात्यांचा आधार वाढविण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने प्राप्तिकर विभागाला चालू वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत 1.25 कोटी नवीन प्राप्तिकरदात्यांना विभागाशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी 1.06 कोटी नवे प्राप्तिकरदाते जोडण्यात आले होते. सध्या देशात करदात्यांची संख्या 6.26 कोटी आहे.