Breaking News

प्लॅस्टिक उत्पादक 16 कंपन्यांवर बंदीची कुर्‍हाड


पुणे : पुणे प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 16 प्लॅस्टिक उत्पादन निर्मात्या कंपन्यांवर बंदीची कुर्‍हाड कोसळली आहे. तर याच प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लॅस्टिक वापरा विरोधात करण्यात आलेल्या स्वतंत्र कारवाईमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये एक हजार 328 व्यवसायिकांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांच्याकडून तब्बल 85 टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. शिवाय या दोषींकडून 19 लाख 72 हजार 319 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. हेरंबप्रसाद गंधे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे प्रादेशिक विभागामधील पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वरील कारवाई करण्यात आली आहे. याच वर्षी 23 मार्च रोजी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीचा अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर सुरवातीच्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक उत्पादनाची निर्मिती करणारे निर्माते, साठवणूकदार आणि विक्रेते यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.