Breaking News

विमा हप्ता भरण्याच्या निमित्ताने 2 लाख रुपयांची फसवणूक

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : विमा कंपनीतून बोलतोय, असे सांगत सातारा शहरातील एकाची दोन लाखाची फसवणूक झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दिलीपकुमार सिताराम सिंग (रा. शाहूपुरी, सध्या रा. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सिंग यांना काही दिवसापुर्वी विमा कंपनीतून बोलत असल्याचे सांगत विमा हप्ता कधी भरणार असे विचारले. त्यानंतर तात्काळ विमा हप्ता भरा असे सांगितले. सिंग यांचा विमा असल्याने व त्याचा हप्ता थकल्याने फोनवरून बोलणार्‍या व्यक्तीवर त्यांनी विश्वास ठेवला. सिंग यांनी संबंधीताला त्यांच्या सातारा येथील व्यवस्थापकाला संपर्क करण्याचे सांगितले. त्यानंतर फोनवरून बोलणार्‍या त्या व्यक्तीने सिंग यांच्या व्यवस्थापकाला विमा हप्ता भरण्यासाठी एक बँक खाते क्रंमाक दिला. त्यावर व्यवस्थापकाने 2 लाख 4 हजार रुपये पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी विमा कंपनीतून हप्ता भरण्याबाबत विचारणा केली. तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीची तक्रार दिली. सिंग यांच्या व्यवस्थापकाने पैसे पाठवलेले बँक खाते उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील एका विनोद नावाच्या व्यक्तीच्या नावाने असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.