Breaking News

साहित्यकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात; 250 साहित्यिकांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत लक्ष घालण्याची विनंती


पुणे/प्रतिनिधी : कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरून उठलेले वादंग, विद्यापीठाने ती कविता वगळणे, त्याविरोधात आदिवासी संघटना, विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, त्यानंतर कवीला आलेल्या धमक्या आदी प्रकरणाच्या संदर्भावरून साहित्यिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असून साहित्यिकाला यातून भयमुक्त करा, अशा शब्दांत राज्यातील सुमारे अडीचशे लेखक, कवी व पत्रकार यांनी पत्र पाठवित मुख्यमंत्र्यांना यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, ना. धों. महानोर, अशोक बागवे, हरिश्‍चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, कवी सौमित्र अशा दिग्गज साहित्यिकांचा समावेश आहे.
कवी दिनकर मनवर यांच्या कवितेचा चुकीचा अर्थ लावून तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग तसेच मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्‍लाघ्य धमक्मया, त्यांच्या विरोधात दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी हे प्रकार अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात, अशा शब्दांत साहित्यिकांनी आपली व्यथा मांडली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीवरून काही आदिवासी संघटनांनी मनवर यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. मनवर यांनी कवितेतून शोषणाचे चित्र मांडताना आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांना विरोध होऊ लागल्याने त्यांची कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतल्यानंतर विद्यापीठावर टीका झाली.

साहित्यिकांचे आवाहन 

कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकावणा़र्‍या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणाऱया आहेत. आपण या प्रकारात लक्ष घालून महाराष्ट्रात भयमुक्त वातावरण निर्माण करावे, असे कळकळीचे आवाहन साहित्यकांनी केले आहे.