Breaking News

पंतप्रधान मोदी अंबानींचे चौकीदार; 30 हजार कोटी अंबानीच्या खिशात घातले; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल


नवी दिल्ली : राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच गंभीर आरोप केलेत. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या 10 दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली.
राफेल प्रकरण मिटवण्यासाठी संरक्षणमंत्री सीतारामण यांना फ्रान्सला जावे लागल्याचा आरोप करत मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार आहेत. राफेल प्रकरणावर मोदी एकही शब्द बोलत नाहीत. मोदी हे जनतेचे नाही, तर अनिल अंबानींचे चौकीदार आहेत, अशी टीका राहुल यांनी केली. देशाचे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत. त्यामुळे ते नजरेला नजर भिडवून बोलू शकत नाहीत. प्रश्‍नांची उत्तरे देता येत नसतील, तर मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी राहुल गांधी यांनी केली. राफेल प्रकरण मिटवण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांना फ्रान्सच्या दौर्‍यावर जावे लागले, असा टोमणा यावेळी राहुल यांनी लगावला. दरम्यान, राफेल प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. दसॉल्ट कंपनीवर रिलायन्स लादले गेले, असा अहवाल नुकताच फ्रान्सच्या मीडियापार्ट या संकेतस्थळाने दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, रिलायन्सची निवड ही मुक्तपणे केली गेली होती, असे दसॉल्टकडून स्पष्ट करण्यात आले.

संरक्षणमंत्र्यांचा फ्रान्स दौरा वादात 
राफेल करारावरून काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यावर हल्ला चढवत, देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती. सरंक्षणमंत्री राफेल प्रकरण मिटविण्यासाठी फ्रान्सला गेल्या असा आरोप देखील गांधी यांनी केला. त्यामुळे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा फ्रान्स दौरा वादात सापडला आहे. राफेल करार प्रकरणी वाद-विवाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डसॉल्ट कंपनीच्या अधिकार्‍यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. राफेल प्रकरणात नरेंद्र मोदींकडून अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींची नुकसान भरपाई मिळाली आहे. तर ही कोणत्या गोष्टीची नुकसान भरपाई दिली असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

राफेलमुळे भाजप सरकारची कोंडी 
फ्रान्स सरकारकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाला असल्याचा केंद्र सरकारवर आरोप आहे. राफेलचे कंत्राट ‘एचएएल’ या सरकारी कंपनीला देण्याऐवजी सरकारने ‘रिलायन्स’ या खासगी कंपनीची निवड केल्याचा सरकारवर आरोप आहे. भारत सरकारतर्फे राफेल खरेदीचे कंत्राट देण्यासाठी रिलायन्स हा एकमेव पर्याय सुचवण्यात आला होता, असे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सांगितल्यानंतर हे प्रकरण उघडकीस झाले. दसॉल्ट एव्हिएशनच्या डॉक्युमेंटमध्ये रिलायन्स डिफेन्सचे नाव कंपनीसाठी अनिवार्य (मँडेटरी) करण्यात आले होते, असे फ्रान्सच्या मीडियापार्ट या संकेतस्थळाने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. दसॉल्ट कंपनीने यावर बोलताना रिलायन्सची निवड ही मुक्तपणे केली होती, असे म्हटले आहे. या प्रकारामुळे भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.