Breaking News

तोतया पोलिसाकडून युवतीला 38 हजाराचा गंडा


कराड (प्रतिनिधी) : पोलीस खात्यात बॉम्ब स्कॉड व डॉग स्कॉड येथे नोकरीस असल्याचे सांगून वडाप चालकाने कॉलेज युवतीची फसवणूक केली. तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला 38 हजार रुपयांना गंडा घातला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित युवतीने कराड शहर पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात तक्रार दिली आहे. सागर यशवंत बोत्रे (रा. बोत्रेवाडी, कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) असे पोलिसात गुन्हा नोंद झालेल्या तोतया पोलीस पोलिसाचे नाव आहे.
 
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराड परिसरातील एक युवती पुणे येथे कॉलेजला आहे. तिचे नेहमी गावाकडे येणे-जाणे होते. 17 सप्टेंबर रोजी ती पुण्याला जाण्यासाठी कराड येथे कोल्हापूर नाक्यावर थांबली होती. त्यावेळी कार घेऊन एक जण तेथे आला. त्या कारमध्ये तीन लोक व चालक बसला होता. चालकाने कुठे जायचे आहे असे संबंधित युवतीला विचारले. त्यावर त्या युवतीने वाकड-पुणे येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे चालकाने त्या युवतीला कारमध्ये घेतले व कार पुण्याच्या दिशेने निघाली. प्रवासात सागर बोत्रेने आपले नाव सांगितले व युवतीचा फोन नंबर घेतला. युवती पुणे येथे उतरल्यानंतर तो मुंबईला निघून गेला. त्यानंतर सायंकाळी त्याने फोन वरून संपर्क करून माझ्या ओळखीवर लालबागच्या गणपतीचे दर्शन घडवितो, असे युवतीला सांगितले. त्यानुसार संबंधित युवती आपल्या मैत्रिणींसह मुंबईला गेली. तेथेही त्याने आपले ओळखपत्र दाखवून गणपतीचे दर्शन घडविले. ओळख वाढल्याने संबंधित युवतीला कराडपर्यंत सोडण्यासाठी सागर बोत्रे येत होता. तसेच त्याने संबंधित युवतीच्या आई-वडिलांचीही ओळख करून घेतली होती. एके दिवशी पुणे येथे कॉलेजवर संबंधित युवतीला भेटून सागर बोत्रे याने मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी सदर युवतीने आई-वडिलांना विचारून निर्णय सांगते, असे सांगितले. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी पाकीट हरवले आहे, असा बहाणा करून सागर बोत्रे याने कॉलेज युवतीला आपल्या बँक खात्यावर दहा हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार या युवतीने बोत्रेच्या खात्यावर रक्कम ट्रान्सफर केली. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी पैशाची गरज आहे, दुसर्‍याला द्यायचे आहेत, असे सांगून कॉलेजवर युवतीला भेटून तिच्याकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून घेतला. त्याच दिवशी त्याने युवतीच्या एटीएम मधून 21 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर एके दिवशी घरी येऊन त्याने संबंधित युवतीच्या आईवडिलांशी युवतीच्या लग्नाच्या अनुषंगाने बोलणी सुरु केली. परंतु, आई-वडिलांनी चौकशी करून कळवतो, असे सांगितले. त्यामुळे सागर बोत्रे पुन्हा गाडी घेऊन मुंबईला निघून गेला. जात असताना त्याने एटीएम संबंधित युवतीला परत दिले नाही. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी पुन्हा सागर बोत्रे याने कॉलेज युवतीच्या एटीएम खात्यावरून सात हजार रुपये काढून घेतले. त्याचा मेसेज मोबाईलवर आल्याने सागर बोत्रे यांच्या विषयी युवतीला संशय आला. त्यामुळे संबंधिताच्यावतीने सागर बोत्रेच्या आई, वडील, मैत्रीण यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी सागर बोत्रे पोलीस खात्यात नोकरीला नाही, तो प्रवासी वाहतूक गाडीतून वडाप करतो. त्याने सांगितलेली ओळखही खोटी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित युवतीने एटीएम कार्ड व पैसे परत आणून देण्यासाठी तगादा लावला. परंतु सागर बोत्रे यांने टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याबाबतची तक्रार संबंधित युवतीने शनिवार दि. 13 रोजी कराड शहर पोलिसात दिली आहे.