Breaking News

भरारी पथकाची 3 ट्रॅक्टरवर कारवाई


म्हसवड (प्रतिनिधी) : माण तालुक्यात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या भरारी पथकाने गुरूवारी पहाटे अवैध वाळु वाहतुक करताना वळई येथे दोन तर म्हसवड येथे एक ट्रॅक्टर पकडला असून भरारी पथकाच्या सततच्या कारवाईने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
गेल्या चार महिन्यापासून माण-खटाव तालुक्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तयार केलेल्या पथकाने आतापर्यंत जवळपास 73 वाहने पकडली असून या पथकाची वाळू माफियांनी चांगलीच धास्ती घेतली असून पथकाचा कारवाईचा धडाका सुरूच आहे. गुरूवारी पहाटे वळई व म्हसवड येथे अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खबर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना लागताच त्यांनी भरारी पथकातील कर्मचार्‍यांचा सापळा लावून वळई येथे भास्कर बळी काळेल यांचे सोनालिका कंपनीचा निळा ट्रॅक्टर (एमएच 11 एफ 3068) तर त्यांचाच दुसरा क्रमांक नसलेला सोनालिका कंपनीचा निळा ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करताना पकडला, तर म्हसवड येथे अमित पिसे यांचा ट्रॅक्टर हा अवैध वाळु वाहतुक करताना पकडला. यावेळी पथकातील कर्मचार्‍यांनी फोन करताच म्हसवडचे सपोनि मालोजीराजे देशमुख यांनी तत्काळ पोलीस कर्मचारी पाठवून दिले. यावेळी कारवाईत तलाठी संतोष ढोले, लिपिक रविराज शिंदे, पोलीस पाटील महेश शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, सुभाष काळेल हे कर्मचारी सहभागी झाले होते. 
माण-खटावचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वाळू तस्करांवर नेहमीच धडाकेबाज कारवाया केल्या असून त्यांनी तयार केलेल्या भरारी पथकाने चार महिन्यात जवळपास 73 वाहने पकडून कारवाई केली आहे. त्यामुळे एकंदरीत वाळू माफियांनी प्रांताधिकारी यांचा चांगलाच धसका घेतला असून त्यामुळे शासनाच्या तिजोरीत लाखो रूपयांचा दंड जमा होत आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे कर्दनकाळ ठरले आहेत. म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांनी अनेक वाळू माफियांवर गुन्हे दाखल केले असून त्यामुळे अनेकांना जेलवारी झाली असल्याने तसेच अद्यापही देशमुख वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करत असल्याने वाळू तस्करी मंदावली आहे.