Breaking News

महावितरणच्या त्रिसुत्री अंतर्गत कुंभारगाव येथे 406 कामे पूर्ण


सातारा (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथे महावितरणच्या एकदिवसीय त्रिसुत्री कार्यक्रम अंतर्गत विविध प्रकारचे 406 कामे पूर्ण करण्यात आले. यामध्ये मागेल त्यांना नवीन वीजजोडणी, वीजदेयकांची व यंत्रणेची दुरुस्ती अशा कामांचा समावेश आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्रिसुत्री कार्यक्रमाची दखल घेतली. 

कराड विभागातील मल्हारपेठ उपविभागातील कुंभारगाव येथे नुकतेच एकदिवसीय त्रिसुत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात मागणीनुसार एक नवीन वीजजोडणी देण्यात आली तसेच वीजयंत्रणेमधील वाकलेले वीजेचे खांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील ताण काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे अशा प्रकारची एकूण 386 कामे पूर्ण करण्यात आली. तर वीजदेयकांच्या दुरुस्ती अभियानात वीजग्राहकांच्या तक्रारीनुसार देयके जागेवरच दुरुस्त करणे, वीजमीटरचे रिंडींग होत नसल्यास ते घेणे, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे अशी 19 कामे करण्यात आली. यावेळी गावकर्‍यांशी संवाद साधून वीजसुरक्षा व ग्राहकसेवाबाबत प्रबोधन करण्यात आले.

मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता सौ. पुनम रोकडे यांच्या मार्गदर्शनात कराड विभागाचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस. के. पाटील, उपकार्यकारी अभियंता अमित आदमाने, सहाय्यक अभियंता धनंजय शेंडे, बी. टी. माळी, सागर यादव, वैशाली भोसले, अजय बोधे यांच्यासह महावितरणचे जनमित्र तसेच कंत्राटदारांचे कर्मचारी कुंभारगाव येथे वीजविषयक कामांसाठी कार्यरत होते. वीजयंत्रणा, नवीन वीजजोडणी, वीजदेयकांबाबत असलेल्या तक्रारी एकाच दिवशी निकाली निघाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.