Breaking News

फटाके विक्रीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी


नवी दिल्ली : फटाक्यांच्या विक्रीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदुषणामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने अटींसह फटाक्यांच्या विक्रीला परवानगी दिली आहे. हा निर्णय केवळ दिवाळीसाठी नव्हे तर अन्य सणांसाठी देखील लागू राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे दिवाळीत केवळ रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्यास न्यायालयाने परवनगी दिली आहे. 

न्यायाधीश ए. के सिकरी आणि न्यायाधीश अशोक भूषण यांनी 28 ऑगस्टला याप्रकरणावर निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी याविषयी बोलताना म्हटले होते, की यासंदर्भात सर्व बाजू लक्षात घेण्याची गरज आहे. फटाके निर्मिती करणार्‍यांचा चरितार्थ चालवण्याचा मूलभूत हक्क, 1.3 अब्ज लोकांचा चांगले, निरोगी जीवन जगण्याचा हक्क या सर्व गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. मागील वर्षी दिल्ली आणि भोवतालच्या भागात फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. याच धर्तीवर देशभरात फटाके विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या सर्व याचिकांवर न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने देशभरात फटाकेविक्रीवर बंदी घालण्यास विरोध केला होता. सरसकट बंदी घालण्याऐवजी केवळ मोठ्या आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी भूमिका केंद्र सरकारने न्यायालयापुढे मांडली होती. यावेळी फटाके विक्रेता आणि उत्पादक संघटनांच्यावतीनेही न्यायालयात बाजू मांडण्यात आली होती. फटाक्यांवरील बंदीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला जाईल, त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, असा युक्तिवाद संघटनांच्यावतीने करण्यात आला होता

सर्वोच्च न्यायालयाच्या अटी
फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीला बंदी
परवानाधारकांना फटाके विक्रीची परवानगी
फटाके वाजविण्यासाठी वेळेची मर्यादा,
रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत परवानगी
हानिकारक फटाके विक्रीला बंदी