Breaking News

तितली चक्रीवादळाच्या थैमानात 8 जणांचा मृत्यू


हैदराबाद - आंध्रप्रदेशात ’तितली’चक्रीवादळाने घातलेल्या थैमानात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यांत या चक्रीवादळामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांचा वीज पुरवठा आणि दळणवळण सेवा विस्कळीत झाली आहे. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे समुद्र किनार्‍याजवळील गावांचा मुख्य शहरांशी संपर्क तुटला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘तितली’ चक्रीवादळाने आता विक्राळ रूप धारण केले आहे. हे वादळ ओडिशा आणि आंध्रच्या किनारपट्टीकडे अत्यंत वेगाने सरकले. 

भारतीय हवामान खात्याने यामुळे दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. ओडिशा सरकारने राज्यातील किनार्‍यालगतच्या जिल्ह्यांतील तब्बल तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. ‘तितली’ चक्रीवादळाचा तडाखा येत्या काही तासात हळूहळू कमी होऊ शकतो. शुक्रवारी सकाळपर्यंत याचा जोर बर्‍यापैकी ओसरला असणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तितली चक्रीवादळ पुढील 12 तासात उत्तरपश्‍चिमी दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरपूर्व पश्‍चिम बंगालच्या दिशेने प्रवास करणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.