Breaking News

राज्यातील 90 टक्के जनतेला आरोग्य कवच : मुख्यमंत्री


लातुर : आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील 90 टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध झाले आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 100 कोटी रुपये तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देण्यात येतील, तर सामान्य रुग्णालयास महिनाभरात जमीन उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. लातूर येथे आयोजित विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून याअंतर्गत 50 कोटी लोकांना आरोग्य कवच उपलब्ध झाले आहे. प्रत्येक रुग्णाला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. 

तसेच राज्यात महात्मा फुले जन आरोग्य व मुख्यमंत्री सहाय्यता निधी या आरोग्याच्या योजनांच्या माध्यमातून 90 टक्के लोकांना आरोग्यावरील विविध उपचार मोफत मिळत आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांना आरोग्यावरील खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेक लोक उपचार घेत नाहीत. उपचारावर झालेल्या खर्चामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना विविध आरोग्याच्या योजनांच्या माध्यमातून त्यांना मोफत उपचाराच्या सुविधा देऊन त्यांचे जीवन आरोग्यदायी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. शासनाच्या आरोग्याच्या या योजनांमुळे ग्रामीण भागातही मोठमोठी अद्ययावत रुग्णालये सेवा सुरु होण्यास मदत मिळेल. त्यामुळे ग्रामीण जनतेला ग्रामस्तरावरच अद्ययावत आरोग्य सेवा मिळाल्याने सर्वसामान्य लोक समाधानी होतील व या माध्यमातून राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवेचे मोठे जाळे निर्माण होईल, असे फडणवीस यांनी म्हटले .


केंद्राच्या अहवालानंतर दुष्काळ जाहीर करू 

केंद्राच्या अहवालानंतर लगेच मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला जाईल असे आश्‍वासन महाष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते लातूरमध्ये अटल आरोग्य शिबिराच्या उदघाटनावेळी बोलत होते. निसर्ग आमचीदेखील परीक्षा घेत आहे. यावेळीही मराठवाड्याच फारच कमी पाऊस झाला मात्र घाबरण्याचे कारण नाही. सरकार काही कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.