Breaking News

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा


शेवगाव प्रतिनिधी

तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आज दि. १२ शेवगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 
या निवेदनात म्हटले आहे. की ऐन सणासुदीच्या काळात जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर या भारनियमनाचा विपरीत परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाणही या भारनियमामुळे वाढले आहे. विज महामंडळाकडून रात्रीच्या वेळी तसेच दिवसा तसेच रात्री वेळीअवेळी भारनियम केले जाते, याला जबाबदार वीज महामंडळाचे अधिकारी व सरकार आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे गरजेचे असताना रात्रीच्यावेळी मुद्दाम वीज पुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांवर विंचू, साप तसेच बिबट्याचे हल्ले होण्याची भिती जास्त आहे. ऑक्टोबरमध्ये प्रचंड उष्णता असताना घरगुती वापराची वीजसुद्धा जाते. त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. 

दरम्यान, भारनियमनाच्या या प्रश्नाबरोबरच पिंगेवाडी, लखमापुरी, चांगतपुरी या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी ही यावेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या. तसेच कांबी येथील सिंगल फेजचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणाही कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. 

या आंदोलनात ताहेर पटेल, नंदू मुंढे, भागवत लव्हाट, नगरसेवक सागर फडके, अनिल सरोदे, संतोष जाधव, गंगा पायघन, संतोष पावशे, मोहित पारनेरकर, कैलास मस्के, इमरान शेख, नितीन बटुळे, गोविंदा किडमिंचे, मोबीन तांबोळी आदींसह युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.