Breaking News

कै. रावसाहेब वाळुंज पतसंस्थेचे ठेवीदार बेमुदत उपोषणावर; ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ


सभासदांच्या ठेवी परत मिळाव्यात ; संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी 

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पिंपळगावदेपा (खंडेरायवाडी) येथील कै. रावसाहेब वाळूंज ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवलेले पैसे गेल्या सहा महिन्यांपासून परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी सोमवार दि.22 ऑक्टोबर रोजी सकाळी संगमनेर प्रांत कार्यालयाच्या गेटसमोर पतसंस्थेच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार या ठेवीदारांनी केला आहे. याबाबत माहिती अशी की, पिंपळगावदेपा (खंडेरायवाडी) येथील कै. रावसाहेब वाळूंज ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत गावातील सुनिल दत्तात्रय वाळूंज, नंदू कारभारी ढेरंगे, अन्ना लालू वाळूंज, लक्षीमन सखाराम पचपिंड, संदीप भाऊसाहेब वाळूंज, संजय शंकर ढेरंगे, भाऊसाहेब ठकाजी ढेरंगे, बाबासाहेब कारभारी ढेरंगे, विठ्ठल महादू तळेकर, भारत ठकाजी ढेरंगे, सतीश भाऊसाहेब वाळूंज, कारभारी ताबाजी कुडेकर, नामदेव भागाजी ढेरंगे, लक्षीमन बाबा वाळूंज, लक्षीमन सिताराम काळे, काशिनाथ भाऊसाहेब वाळूंज यांच्यासह आदी ठेवीदारांनी पैसे पतसंस्थेत ठेवले होते. पण मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे मिळत नाही. पैसे काढण्यासाठी वरील ठेवीदारांनी गेल्या सहा महिन्यापासून वारंवार संस्थेमध्ये हेलपाटे मारले. परंतु संस्थेच्या चेअरमनसह पदाधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

त्यामुळे पतसंस्थेतील आमच्या ठेवी तात्काळ देण्यात याव्यात, प्रशासनाने संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी, कै रावसाहेब वाळूंज पतसंस्थेच्या संचालक मंडळावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशा विविध मागण्यांसाठी वरील ठेवीदारांनी संगमनेर येथील नविन नगर रोडवर असणार्या प्रांत कार्यालयाच्या गेटसमोर सोमवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या ठेवीचे पैसे मिळत नाही, तोपर्यंत आमचे हे बेमुदत आमरण उपोषण असेच सुरु राहणार असल्याचेही उपोषणकर्त्यांनी सांगितले.

सन 2017-18 या कालावधीच्या लेखापरीक्षण अहवालात 70 लाख 72 हजार 230 रुपये अपहाराबाबत संस्थेच्या ऐकून 17 व्यक्तीं जवाबदार असून सबंधीताना नोटीस देऊन म्हणणे मांडणेसाठी 24 ऑक्टोबर रोजी कार्यालयात उपस्तीत राहण्यास सांगितले आहे. अन्यथा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (5) (ब) मधील तरतुदी नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केले जातील.
:- गणेश पुरी, उपनिबंधक, सहकारी संस्था संगमनेर