थकीत शेतीपंप वसुली मोहीमेला स्थगिती; महावितरणची अखेर नरमाईची भूमिका


मुंबई : दुष्काळजन्य परिस्थितीमुळे खरीप हातचा गेल्यात जमा असताना रब्बीबाबतही आशा दुरावल्या आहेत. या पार्श्‍वभुमीवर महावितरणने शेतकर्‍यांकडील शेतीपंपाच्या थकबाकीची सुरू केलेली वसुली मोहीम अखेर स्थगित करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमे आणि विरोधकांनी या कारवाई विरोधात आवाज उठवल्यानंतर थकबाकीदार शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडणी थांबवून किमान वीजबिल भरण्याची विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे. राज्यात 41 लाख शेतकर्‍यांकडे शेतीपंपाची सुमारे 22 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतीतून उत्पन्नच आले नाही, तर बिले भरायची कशी? असा शेतकर्‍यांपुढील प्रश्‍न होता. गेल्या वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सरकारच्या आदेशाने महावितरणने शेतकर्‍यांकडून सवलतीच्या नावाखाली जोरदार वसुली केली. त्याचपद्धतीने आताही वसुलीचा प्रयत्न होता. महावितरणमध्ये या वसुलीसाठी खास पथके स्थापनकरुन तालुका पातळीवरुन ही वसुली मोहीम सुरू करण्यात आली होती.

गेल्याच आठवड्यात शेतीसाठीचा दिवसाचा वीजपुरवठा 8 तासावरुन 6 तासांवर आणण्यात आला आहे. त्याच्या वेळाही बदलल्या आहेत. शेतकरी एकीकडे या परिस्थितीशी दोन हात करीत असताना आता थेट त्यांच्या थकबाकी वसुलीची मोहीम राबवून शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न महावितरणकडून केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप होता. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी शेतकर्‍यांना थकीत असलेली थोडीतरी वीजबिल (किमान 3 हजार) भरण्याची विंनती केल्याचे सांगितले आहे. खरीपाठोपाठ रब्बी संकटात असून सोयाबीन- कापूस हातातून गेले आहे. महावितरणने वसुलीची कारवाई केली महावितरणच्या अधिकार्‍यांना ठोकून काढले जाईल असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले. महावितरणला रोजच्या रोज वीजखरेदीसाठी पैसे द्यावे लागतात. शेतकर्‍यांकडून वसुलीला प्रतिसाद मिळत नाही. महावितरणची वीजेची मागणी 20 टक्के वाढली आहे. शेतकर्‍यांना आठ तास वीज देण्याचा प्रयत्न आहे, असे चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget