Breaking News

अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी


वडूज (प्रतिनिधी) : अपघातात जखमी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विनायक श्रीमंत साळुंखे (रा. कांचनपूर ता. मिरज जि. सांगली) यास वडूज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. पाठक यांनी दोषी धरून तीन महिने सक्तमजुरी व बाराशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आरोपी विनायक श्रीमंत साळुंखे दि. 26 डिसेंबर 2014 रोजी त्यांच्या ताब्यातील मारुती वॅगनआर या चारचाकी वाहनाने पोपट भगवान माळी (रा. वांझोळी ता. खटाव जि. सातारा) यांना भरधाव वेगाने पुसेसावळी-कराड रोडवर चुकीच्या बाजूने जाऊन धडक देऊन गंभीर जखमी केलेले होते. या अपघाताची माहिती व तक्रार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दत्तात्रय दादासो मगर (रा. पुसेसावळी ता. खटाव) यांनी औंध पोलीस ठाण्यात दिलेली होती. या अपघाताची नोंद औंध पोलीस ठाण्यात होऊन गुन्हा नोंद झाला होता. सदर अपघातानंतर जखमी होऊन पोपट भगवान माळी यांचा मृत्यू झाला होता. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे रमेश साळुंखे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांनी कामकाज पाहिले. साक्षीदाराची साक्ष सरकारी अभियोक्त्यांचा युक्तीवाद व पुरावा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी विनायक साळुंखे यास दोषी धरून शिक्षा ठोठावली. याकामी अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉड चे तौसिफ शेख, सहाय्यक फौजदार शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी, सुधीर मोहिते, पोलीस हवालदार विलास हांगे यांनी सहकार्य केले.