Breaking News

जमीनीचे रेखांकन करण्यासाठी अंध व्यक्तीचे नगर रचनाकार कार्यालयासमोर उपोषण


अहमदनगर (प्रतिनिधी)- कागद पत्राच्या पुर्ततेसह शुल्क जमा करुन देखील जमीनीचे रेखांकन करून न देता उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने अनिल समुद्र या अंध व्यक्तीने टीव्ही सेंटर येथील नगर रचनाकार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

अनिल विश्‍वनाथ समुद्र हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून, त्यांची कर्जत तालुक्यातील मौजे भांडेवाडी येथे गट क्रमांक 346 जागा आहे. सदर जागेचे रेखांकन करुन मिळण्यासाठी नगर रचनाकार कार्यालयात यापूर्वी दोन वेळा 500 रुपये भरून येणे फाईल जमा केली होती. परंतु याबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी कर्जत नगरपंचायत मार्फत सर्व नियम अटीनुसार प्रस्ताव वीस दिवसांपूर्वी दाखल केला होता. नगर रचनाकार कार्यालयात सतत पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. प्रस्ताव दाखल केल्यानंतर प्रस्ताव तारीख सुद्धा देण्यात आलेली नाही. अंध व्यक्तीकडून आर्थिक हेतू साधला जात नसल्याने सदर काम प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने उपोषण सुरु केले आहे. मिळकतीचे रेखांकन करून मिळत नाही तो पर्यंन्त उपोषण चालू ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.