Breaking News

शहरटाकळी हायस्कूल मध्ये आकाश कंदील बनवा कार्यशाळा


भावीनिमगाव/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बुधवार रोजी दिपावली सणा निमित्ताने ‘पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवा ’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री. गणपत शेलार यांच्या कल्पनेतून या कार्यशाळेत इयत्ता 5 वी ते 12 वी च्या वर्गातील 288 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्याच्या कला गुणांणा वाव मिळावा आणि पर्यावरण संरक्षण कामी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी हा उद्देश समोर ठेवून ही कार्यशाळा घेण्यात आली. बाजारातील प्लास्टीकचे आकाश कंदील खरेदी न करता साध्या रंगीत घोटीव कागद, कार्डशिट , रंग यांपासून अत्यंत अल्प खर्चात विद्यार्थ्यांना आकाश कंदील बनवण्याचे प्रात्यक्षिक विद्यालयाचे कलाशिक्षक श्री शितलकुमार गोरे यांनी यावेळी दाखवले व विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे आकाश कंदील बनवले. या कार्यशाळेत विद्यार्थ्याचा सहभाग उत्स्फूर्त दिसला आणि कल्पकतेने एकाग्र होऊन आनंदाने विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले. पैशाची बचत, कलेला संधी व पर्यावरणाचे संरक्षण हे हेतू या उपक्रमातून साध्य झाल्याचे प्राचार्य गणपत शेलार यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना पर्यावरणा संबंधी मार्गदर्शन करून फटाके मुक्त दिवाळीची शपथ दिली गेली. यावेळी सरपंच बाळासाहेब ठोंबळ, विद्यालयाचे प्राचार्य. गणपत शेलार, विद्यार्थी उपस्थित होते.