Breaking News

भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये; संगमनेरच्या शेतकर्यांचे महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडे मागणी

संगमनेर ( प्रतिनिधी ) 
संगमनेर , अकोले सह नगर व नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वन वन होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडू नये अशी मागणी संगमनेरच्या शेतकर्यांनी मुंबईत महाराष्ट्र जल प्राधिकरणाला निवेदन देवून केली आहे. 
मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची आज बैठक होती. या बैठकीपुर्वी सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी यांची प्रवरा उपखोरे पाणी बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांनी भेट घेतली. यामध्ये रमेश गुंजाळ ( खांडगाव ) , रोहिदास पवार (मंगळापूर ), संतोष हासे ( राजापूर ) , शंकरराव ढकम ( शिबलापूर ) शेखर वाघ ( खराडी ) कैलास वर्पे ( चिकणी ) , बबन सुपेकर ( वडझरी ) यांसह विविध शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हरिश्‍चंद्र फेडरेशनच्या वतीने सविस्तर निवेदनही देण्यात आले.

प्रवरा उपखोरे पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील शेतकर्यांनी ही मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की , उत्तर नगर जिल्हा हा पूर्णत: दुष्काळी असल्याने या भागासाठी भंडारदरा व निळवंडे धरणाची निर्मिती झाली. हा प्रदेश पर्जन्यछायेचा असून या भागात अत्यंत कमी पाऊस पडतो. यावर्षी तर अगदीच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात पूर्णत: दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तळेगाव भागात तर भर पावसाळ्यात टँकर सुरू आहेत. दर दिवस पाण्याची तीव्रता वाढवणारी असून टँकरची संख्या ही वाढणार आहे. या भागात पशुधन मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून माणसे व पशुधन जगविण्यासाठी येथेच पाण्याची कमतरता निर्माण होणार आहे. संगमनेर तालुक्यात दुष्काळ निवारणासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिक यांनी संघटीतपणे जायकवाडीला यावर्षी पाणी सोडू नये अशी मागणी केली आहे. 

याबाबत समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 च्या विरोधात यापुर्वीच हरिचंद्र फेडरेशन व थोरात कारखान्यांने न्यायालयात दाद मागितली आहे. येथील जनतेसाठी पाणी कमी पडणार असल्याने जायकवाडीला पाणी सोडू नये अन्यथा तीव्र मोठे जनआंदोलन छेडले जाईल असा इशाराही प्रवरा उपखोरे पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.