Breaking News

बचत गटातील महिलांची फसवणूक


खंडाळा (प्रतिनिधी) : महिला बचत गटातील सभासदांना बचतीच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जनाची संधी, कौटुंबिक विकास व रोजगार निर्मितीचे आमिष दाखवून सक्सेस ग्रुप संचलित श्री महालक्ष्मी नारायण महासंघाच्या नावाखाली दोन वर्षे महिलांकडून रक्कम जमा केली. मात्र, मुदतीनंतर ठेवीची रक्कम व व्याज परत न मिळाल्याने महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढमढेरे व त्यांच्या पत्नी मंदाराणी ढमढेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुण्यातील सक्सेस ग्रुप संचलित श्री महालक्ष्मी नारायण महासंघ, पुणे नावाने बचत गट स्थापन करण्याचे कार्यालय अहिरे, ता. खंडाळा येथे सुरू करून खंडाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिला बचत गट स्थापन करण्यात आले. खंडाळा पोलिस ठाण्यातर्ंगत 12 गावांतील 700 पेक्षा जास्त महिलांशी संपर्क साधून प्रत्येकी 15 महिलांचा एक बचत गट तयार केला. त्यामध्ये बचत गट अध्यक्षांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत गटातील महिलांकडून प्रति महिना 200 रुपयाप्रमाणे महासंघाकडे भरण्यास सांगितले. त्यानंतर वेळावेळी सदर महिलांच्या बैठका घेऊन शिवाजी ढमढेरे व मंदाराणी ढमढेरे (रा. दापोडी, पुणे) यांनी बचत गट कसा चालवायचा याचे मार्गदर्शन केले.
यावेळी महिलांना बचतीच्या माध्यमातून उत्तम अर्थार्जनाची संधी रोजगार निर्मिती याबाबत आमिष दाखवून दोन वर्षे महिलांकडून रक्कम भरून घेतली. ठेव रकमेची एक वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर बचत गटातील महिलांनी गुंतवणूक केलेली रक्कम व व्याज 46 हजार परत मिळण्याकरिता अहिरे येथील कार्यालय व संस्थापक शिवाजी ढमढेरे यांच्याकडे मागणी केली. वारंवार पाठपुरावा करून ही रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर लोहोमचे माजी सरपंच अरुण अशोक जाधव यांच्यासह 17 जणांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.