अण्णाभाऊंच्या कला पथकातील ‘शंभरी’चा झिलकरी

भरतगाववाडीच्या पांडुरंग काटकर यांनी जागवल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी
गुरुदास अडागळे/सातारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह शाहीर अमर शेख व गवाणकर यांच्या कलापथकाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रात अण्णांच्या खड्या आवाजाला साथ देण्याचे भाग्य लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील भरतगाववाडीच्या पांडुरंग रामभाऊ काटकर यांनी नुकताच अण्णांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. वयाची शंभरी पूर्ण केली तरीही काटकर आजही तितकेच तल्लख आणि काटक आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील भरतगाववाडी हे गाव तेथील गणेश मंदिरासाठी प्रसिध्द आहे. याच भरतगाववाडीच्या शिवारात छोट्याशा टुमदार घरात राहणार्‍या पांडुरंग रामभाऊ काटकर यांनी मुंबईत नोकरी करत असताना त्यांच्याच गावातील नाना पांडू पवार व मांडवेच्या लालासाहेब पवार यांच्या ओळखीने   अण्णाभाऊ साठे यांच्या कलापथकात सन 1945 मध्ये प्रवेश केला. भजनाची आवड आणि खडा आवाज यामुळे त्यांची अण्णांच्या ‘लाल बावटा’ या कलापथाकातील झिलकरी म्हणून वर्णी लागली. त्यानंतर सलग सात वर्षे काटकर यांनी अण्णांसोबत उभा महाराष्ट्र पालथा घातला. 
अण्णा एकदम भारी माणूस अशा शब्दात लोकशाहीरांचे वर्णन करणारे पांडुरंग काटकर आजही अण्णांच्या सोबत गायलेल्या कवनातील ओळ न चुकता म्हणून दाखवतात. मुंबईच्या प्रभादेवी परिसरातील नागू सयाचीवाडी आणि पत्र्याची तालीम यासोबत मुंबईच्या अनेक जुन्या भागांची नावे आजही त्यांना तोंडपाठ आहेत. वयाच्या शंभरीतही पहाटे 5 वाजता उठून आपला दिनक्रम सुरु करणारे पांडुरंग पवार आजही आपल्या अल्पशा शेतीतील सर्व कामे करतात. पाटेश्‍वरच्या डोंगराच्या पायथ्याला असलेल्या जमिनीत भविष्यात गोपालनचा उपक्रम राबवण्याची मनिषा बाळगणार्‍या काटकरांची ऊर्जा थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती रक्मिणी या जुन्या काळातील सातवी पास आहेत. वयाची 85 गाठलेल्या या अर्धांगिनीने आपल्या हरहुन्नरी पतीला दिलेली साथही तितकीच मोलाची आहे असे स्वत: पांडुरंग काटकर कबूल करतात. राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या आपल्या छोट्याशा टुमदार घरात राहणारे हे दांम्पत्य अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून परिचित आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सातारा येथील क्रांती थिएटर्सच्यावतीने 2020 मध्ये थेट रशियातील मास्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाला येण्याचा मानस व्यक्त करणार्‍या पांडुरंग काटकर यांच्या शंभरीचे रहस्य त्यांच्या निर्वसिनी असण्यात आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget