Breaking News

सातारा शहर पोलीस ठाण्यासमोरील जुगार अड्ड्यावर छापा; चौघांना अटक

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी) : सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसाय उखडून काढण्याचे आदेश दिल्याने सर्वत्र कारवाई सुरु असताना पोलीस मुख्यालय परिसर व शहर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या भवानी मंदिराच्या परिसरात जुगार खेळताना चौघांना अटक केली. नागरिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.


मल्हारपेठ परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जुगाराचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. पोलिसांनी चौघांना अटक करत मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी शामसुंदर महादेव लोकरे (वय 58, रा. गोडोली), रामचंद्र भानु माने (वय 44, रा. मंगळवार पेठ), सुरज चंद्रकांत रोकडे (वय 21, रा. संभाजीनगर), सुरज भानुदास मोरे (रा. करंजे) यांना अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यात अवैध धंदे सुरु आहेत. त्यावर आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व ठाणेदारांना बेकायदा व्यवसाय बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शनिवारी सायंकाळी उशीरा पोलीस मुख्यालयाशेजारी व सातारा शहर पोलीस ठाण्याच्या समोर बिनधोकपणे जुगार खेळला जात असल्याचे काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या छापा टाकला.
मल्हार पेठेतील भवानी मंदिराच्या परिसरात हा जुगाराचा अड्डा सुरु होता. हे ठिकाण शहर पोलीस ठाण्याजवळ आहे. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळावरून 2 हजार रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार मुबीन मुलाणी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.