Breaking News

अल्पवयीन मुलाने केला मित्राचा खून


।संगमनेर / प्रतिनिधी।

येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दोन मित्रांमध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणावरून वाद निर्माण झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपी मुलाला (मयताचा मित्र) ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची सर्व कबुली दिली आहे.

या घटनेत प्रमोद संजय वाघ (वय-१८, रा. तिगाव, ता. संगमनेर) हा मयत झाला. गेल्या शनिवारी दि. ६ रोजी संगमनेर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणाच्या उद्देशाने तो घरातून निघाला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. याबाबत प्रमोदच्या कुटुंबियांनी तालुका पोलिस ठाण्यात दि.९ रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरु केली असता प्रमोदच्या एका अल्पवयीन मित्राचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी मुलगा पोपटासारखा बोलू लागला. शनिवारी दि. ६ रोजी तालुक्यातील खांडगाव शिवारातील कपालेश्वर मंदिराजवळ प्रमोद व आरोपी मित्र फिरायला गेले होते. एका मुलीच्या प्रेमप्रकरणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला.त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन रागाच्या भरात आरोपीने प्रमोदवर चाकूने वार केले. यात त्याचा मृत्यू झाल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानुसार आज सकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. अल्पवयीन आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. खिळे हे करीत आहेत.