Breaking News

झोपडी निवास आंदोलनामुळे ‘जय महेश’च्या पिडीत शेतकर्‍यांना अखेर न्याय


शिवसेना नेता डॉ.नीलम गोर्‍हे यांची यशस्वी शिष्टाई; १८ऑक्टोबर पर्यंत ऊस बीले देण्याची हमी

माजलगाव (प्रतिनिधी):- ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर पिडीत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या ’झोपडी निवास आंदोलना’ला मोठे यश आले आहे. साखर आयुक्त आणि जय महेश कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या येत्या १८ऑक्टोबरला पूर्ण थकित रक्कम देण्यात येणार असल्याची लेखी हमी जय महेश कारखान्याने आज दि. १२ऑक्टोबर शुक्रवार रोजी दिली.
 
दरम्यान शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोर्‍हे यांनी साखर आयुक्त संभाजी कडूपाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य शिष्टाई केली आणि पिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. 
गेले तीन दिवस जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या पिळवणूकी विरोधात तब्बल ३०० शेतकरी कुटुंबीय पुण्यातील साखर संकुलासमोर झोपडी निवास हे अभिनव आंदोलन केले. या आंदोलनाला मिळालेला मोठा प्रतिसाद पाहता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आणि शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक व माजलगाव शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव यांच्यासह पिडीत शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. या दोन दिवशीही चर्चेनंतर आज पिडीत शेतकरी, शिवसेना पदाधिकारी व साखर आयुक्त यांच्यात समाधानकारक चर्चा होवून योग्य तोडगा निघाला. शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा आमदार डॉ.नीलम गोर्‍हे यांनी योग्य शिष्टाई करुन शेतकऱ्यांच्या वतीने आपली प्रभावी बाजू मांडली साखर आयुक्त आणि आंदोलक यांच्यात झालेल्या शिष्टाई नंतर जय महेश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी या प्रश्नी अधिकृत पत्र दिले आहे. कारखाना प्रशासनाच्या वतीने गिरीष लोखंडे यांनी दिलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, येत्या १८ ऑक्टोबर रोजी पिडीत शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बीले देण्यात येतील अशी हमी दिली आहे.